Pune Vaishnavi Hagawane Case : हुंडा आणि त्यासाठी दिला जाणारा त्रास हा अजूनही समाजात कमी झालेला नाही. पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेनं स्वत:ला संपवल्यानंतर ते पुन्हा समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणेने 16 मे रोजी आत्महत्या केली. या प्रकरणाने पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, वैष्णवीच्या आत्महत्येमागे हुंड्याचा छळ आणि कौटुंबिक हिंसाचार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे याला पोलिसांनी अटक केली. तर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राचा कबुलीनामा! पाकिस्तानात कधी, कुठे आणि काय केलं... यंत्रणांना मिळाली महत्वाची माहिती
2023 मध्ये काय घडलं? FIR मधून काय समोर आलं?
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमधून हे सर्व प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचं समोर आलंय. वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी बावधन पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती.या तक्रारीत तिने पती शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचा उल्लेख केला होता. एफआयआरनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवीने गरोदर असल्याची माहिती शशांकला दिली. तेव्हा त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. "हे बाळ माझं नाही, दुसऱ्याचं आहे," असं म्हणत वैष्णवीसोबत भांडण केलं. यानंतर शशांक आणि सासरच्या मंडळींनी वैष्णवीला मारहाण करून "घरातून निघून जा, नाहीतर हाकलून देईल," अशी धमकी दिली. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा >> दहावीत 96 टक्के पडलेल्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, परीक्षा सुरू असताना वसतिगृहात स्कार्फने...
पुढे वैष्णवी या छळाला कंटाळून वैष्णवी माहेरी गेली. तिने आपल्या आई-वडिलांना सासरच्या छळाची आणि हुंड्यासाठी पैशाच्या मागणीची माहिती दिली. एफआयआरमधून असेही समोर आलंय की, 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने सासरच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. अखेर 16 मे रोजी तिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मात्र, या प्रकरणात वैष्णवीने खरंच स्वत:ला संपवलंय की हत्या झालीये हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
लग्नात सासरच्यांना काय काय दिलं होतं?
पोलीस तपासातून असं समोर आलंय की, राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी आणि चांदीची भांडी हुंडा म्हणून घेतली होती. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी शशांक हगवणे याला ताब्यात घेतलं असून, फरार राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात हुंडा विरोधी कायदा आणि कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
