बुलढाणा : नांदुरा तालुक्यातील प्रसिद्ध निम्बादेवी मंदिराजवळ रविवारी (15 जून 2025) एक हृदयद्रावक घटना घडली. विश्वगंगा नदीच्या किनाऱ्यावरील निसरड्या पायऱ्यांमुळे 20 वर्षाची महिला आणि 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पायऱ्यांवरुन निसटल्यानं थेट नदीत बुडून या दोघींचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> कुंडमळ्यात मोठी दुर्घटना! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला..6 जणांचा मृत्यू, तर अनेक पर्यटक...
कशी घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आपल्या कुटुंबीयांसह मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्या नदीकिनारी गेल्या. तिथेच निसरड्या पायऱ्या होत्या. या पायऱ्यांमुळे पाय निसटल्यानं त्यांचा तोल गेला आणि त्या मुलीसह नदीत पडल्या.
स्थानिकांनी केला वाचवण्याचा प्रयत्न, पण...
नदीचं खोल पाणी आणि जोरदार प्रवाह यामुळे कुटुंबीय आणि स्थानिकांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही. मल्कापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
हे ही वाचा >> मुंबईत यलो अलर्ट! कोणत्या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस? ठाण्यातही धडकणार वादळी वारे
स्थानिकांच्या मते, निम्बादेवी मंदिरात दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते, पण नदीकिनाऱ्यावरील पायऱ्या निसरड्या असल्यानं धोका कायम आहे. या दुर्घटनेनंतर मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
ADVERTISEMENT
