अकोला- धनंजय साबळे: काल म्हणजेच 16 जानेवारी 2025 रोजी राज्यातील महानगरपालिकांचे निकाल घोषित झाले. हे निकाल जाहीर झाल्यानंतर शहरांमध्ये कुठे विजयोत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळतंय तर कुठे हल्ला, मारहाणीच्या घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. अकोल्यातील अकोटफैल परिसरातून सुद्धा अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महापालिकांचे निकाल घोषित झाल्यानंतर, नवनिर्वाचित भाजप नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पक्षातील दुसऱ्या पराभूत उमेदवाराशी झालेल्या वादात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
भाजप नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, वार्ड क्र. 2 मधून पराभूत झालेले उमेदवार नितिन रावत आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूकीत विजय आणि पराभवाच्या वादातून शरद तुरकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अकोटफैल पोलीस स्टेशनच्या समोर ही भयानक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या शरद तुरकर यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांना चांगल्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. आता, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हे ही वाचा: पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
या घटनेनंतर दोन्ही गटांच्या समर्थकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून पोलिसांनी दंगलखोरांचा पाठलाग केला आणि लाठीचार्ज केला. यादरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, दोन्ही गटांतील दंगलखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके सुद्धा तयार करण्यात आली आहेत. संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष बाब म्हणजे, या प्रभागात शरद तुरकर हे एकमेव भाजप उमेदवार आहेत, तर इतर तीन जागांवर एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, हे प्रकरण पक्षातील गटबाजीशी संबंधित असल्याचे दिसून आलं आहे. अकोला शहर विभागाचे अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनेला दुजोरा दिला आणि कायदा, सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT











