पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी 2 हजार 621 मते मिळवत विजय संपादन केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी निवडणूक जिंकला
श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
Shrikant Pangarkar News, जालना ; पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. श्रीकांत पांगारकर हे प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. या प्रभागात त्यांच्या विरोधात भाजपसह इतर राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या प्रभागात कोणताही उमेदवार देण्यात आलेला नव्हता. या महानगरपालिका निवडणुकीत श्रीकांत पांगारकर यांनी 2 हजार 621 मते मिळवत विजय संपादन केला आहे.
श्रीकांत पांगारकर यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशावर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने अवघ्या एका दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशास स्थगिती दिली होती. श्रीकांत पांगारकर हे 2001 ते 2006 या काळात शिवसेनेचे जालना नगरपरिषदेचे नगरसेवक होते. 2011 मध्ये पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी उजव्या विचारसरणीच्या हिंदू जनजागृती समितीत प्रवेश केला होता. ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यातील विविध ठिकाणांहून स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकर यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांच्यावर स्फोटक कायदा, स्फोटक पदार्थ कायदा तसेच बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा : BMC Election Results 2026: मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा नेमका निकाल, पाहा आता तुमचा नवा नगरसेवक कोण
दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकर यांना जामीन मंजूर केला आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती आणि या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती. या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत 18 संशयितांची ओळख पटवली असून 17 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा खटला जुलै 2022 पासून सुरू आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी 2 हजार 621 मते मिळवत विजय संपादन केला आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना पांगारकर म्हणाले की, “मला जनतेच्या न्यायालयात न्याय मिळाला आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.”










