बदलापूर : 'माझी आई मेली..' चार वर्षांच्या मुलासमोर कारमध्ये काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

• 11:40 AM • 12 Jun 2026

एका कारमध्ये महिला आणि त्या कारच्या ड्रायव्हरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेचा उलगडा मृत महिलेच्या चार वर्षांच्या मुलामुळे झाला.

Badlapur Crime News

Badlapur Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बदलापूर : 'माझी आई मेली..'

point

चार वर्षांच्या मुलासमोर कारमध्ये काय घडलं?

Badlapur Crime News : बदलापूर पूर्व मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील जुवेली परिसरात गुरुवारी (11 जून) दुपारी एका कारमध्ये महिला आणि त्या कारच्या ड्रायव्हरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेचा उलगडा मृत महिलेच्या चार वर्षांच्या मुलामुळे झाला. हा चिमुकला कारमधून बाहेर पडून जवळच राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे पोहोचला आणि 'माझी आई मेली आहे,' असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने नातेवाईकांना कारपर्यंत नेले असता, तिथे एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हे वाचलं का?

चार वर्षांच्या मुलाने पाहिला थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला गेल्या तीन महिन्यांपासून जुवेली परिसरात वास्तव्यास होती. तर मृत पुरुषाची ओळख मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी गणेश शिंदे अशी झाली असून तो कॅब चालक होता. दोघांच्याही शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या टीमला पाचारण केले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही घटना घडली तेव्हा चार वर्षांचा मुलगा कारमध्येच होता आणि त्याने हा संपूर्ण थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असावा.

हे ही वाचा : 'नवरा कामावर गेल्यावर सासरा माझ्यासोबत...' सुनेनं गाठलं पोलीस स्टेशन; काय घडलं?

कॅब चालकाचा मृत्यू कसा झाला?

कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, मुलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश शिंदे याने आधी महिलेवर जीवघेणा हल्ला करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मात्र, शिंदे यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल तपास अद्याप सुरू आहे. पोलीस आता मृत महिला आणि गणेश शिंदे यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाईकांनी आपल्याला गणेश शिंदेबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

हे ही वाचा : विवाहित पुरुषाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिप, शेवटी भयंकर घडलं!

पोस्ट मार्टम अहवालात काय?

सध्या बदलापूर पूर्व पोलीस दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवून घेत असून मृतदेहांचे शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रम पूर्णपणे स्पष्ट होऊ शकेल. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बदलापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.