बदलापूर: बदलापूर शहरात शिंदेंची शिवसेना आणि भाजप पक्षातील अंतर्गत वादातून धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोन्ही पक्षातील हा वाद आता थेट रस्त्यावर उतरल्याचं चित्र समोर आलं आहे. बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आत्मीया हाईट्स या सोसायटीमध्ये ही घटना घडली असून येथे शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजप पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. संबंधित घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
माघी गणपती दर्शनासाठी सोसायटीत आले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक हेमंत चतुरे हे माघी गणपती दर्शनासाठी सोसायटीत आले होते आणि त्यावेळीच त्यांच्यावर भीषण हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यात चतुरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर बदलापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ही संपूर्ण मारहाणीची घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचे व्हिडिओ फुटेज सध्या व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: गडचिरोली: प्रेमविवाह ते निर्दयी हत्या; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं, एका महिन्यानंतर मृत्यू! दोन मुलं अनाथ...
"स्वीकृत नगरसेवक पद दिल्याचा राग..."
मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव तेजस मस्कर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणासंबंधी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संजय जाधव यांनी हल्लेखोरांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीत भाजप उमेदवाराविरुद्ध पराभव झाला असला तरी शिवसेना शिंदे गटाने हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं, याचाच राग भाजप पदाधिकाऱ्यांना असल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला आहे.
हे ही वाचा: ‘बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या…’, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती सत्तेत असतानाही बदलापूर शहरात मात्र दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर वैरी असल्याचं चित्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमधून स्पष्ट होत आहे.
ADVERTISEMENT











