बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन् मेकअप.., छेड काढणाऱ्या 'रोमिओ'ला तरुणीने शिकवला धडा VIDEO

मुंबई तक

18 Jul 2026 (अपडेटेड: 18 Jul 2026, 10:02 AM)

Badnera Akola Express Crime : बडनेरा-अकोला एक्सप्रेसमध्ये एका तरुणीशी कथित छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला तरुणीने प्रवाशांच्या मदतीने धडा शिकवलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Badnera Akola Express Crime

Badnera Akola Express Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन् मेकअप..,

point

छेड काढणाऱ्या 'रोमिओ'ला तरुणीने शिकवला धडा

Badnera Akola Express Crime, धनंजय साबळे : बडनेराहून अकोल्याकडे येणाऱ्या कोला-बडनेरा एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका तरुणीशी कथित छेडछाड करणाऱ्या युवकाला एका धाडसी तरुणीने आणि सहप्रवाशांनी वेगळ्याच पद्धतीने धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान संबंधित युवकाने तरुणीशी कथितपणे गैरवर्तन करण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरून न जाता त्या तरुणीने त्याच्याविरोधात तात्काळ आवाज उठवला. तिच्या धाडसी भूमिकेमुळे डब्यातील इतर प्रवासीही तिच्या मदतीसाठी पुढे आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली, ढुं#&% सोडून चोऱ्या...', पेडणेकरांचा रुद्रावतार!

तरुणीच्या धाडसाचे अनेक प्रवाशांनी केले कौतुक

या घटनेदरम्यान संबंधित युवकाला मारहाण करण्यात आली नाही. त्याऐवजी प्रवाशांच्या मदतीने त्याच्या हातात बांगड्या घालण्यात आल्या तसेच त्याच्या चेहऱ्यावर लिपस्टिक लावली आणि मेकअप करण्यात आला. महिलांचा सन्मान करणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तरुणीच्या धाडसाचे डब्यातील अनेक प्रवाशांनी कौतुक केले. या संपूर्ण प्रकारामुळे काही वेळ डब्यात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले आणि उपस्थित प्रवाशांनीही या घटनेची दखल घेतली.

हेही वाचा : समजून घ्या: डीलिमिटेशनमध्ये मतदारसंघ असे काही बदलले की काँग्रेसचा विश्वासच राहिला नाही?

छेडछाडीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज 

या घटनेनंतर महिलांवरील अन्याय आणि छेडछाडीविरोधात महिलांनी आता गप्प न बसता ठामपणे भूमिका घेण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अशा प्रसंगी समाजातील इतर नागरिकांनीही महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या घटनेतून समोर आल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांकडून तरुणीच्या धाडसाचे आणि प्रवाशांच्या सहकार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमध्ये संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबवणे हा सर्वात योग्य आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. बडनेरा ते अकोला दरम्यान घडल्याचा दावा करण्यात आलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला तरुणीच्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना यामधून स्पष्ट संदेश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र, कोणत्याही अशा प्रकरणात कायद्याचे पालन करत पोलिसांची मदत घेणे हीच जबाबदार भूमिका असल्याचेही अधोरेखित केले जात आहे.