Beed Accident News : रोहिदास हातागळे / बीड : पोटाची खळगी भरण्यासाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी ऊसतोडणीला गेलेल्या एका कष्टकरी कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला आहे. लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून गणेश डोंगरे (वय ३०, रा. डोंगरयाची वाडी/सोन्नाखोटा,वडवणी, बीड) या तरुण ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या डोळ्यादेखत हा भीषण अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा दुर्दैवी अंत
गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हे आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह यावर्षी लातूरला ऊसतोडणीसाठी गेले होते. हे दाम्पत्य सोशल मीडियावर 'रीलस्टार' म्हणून प्रसिद्ध होते. कष्टाची कामे करत असतानाही ते आनंदाने आपले व्हिडिओ शेअर करायचे. मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर मापाच्या प्रतीक्षेत उभा असताना, शेजारून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावर उलटली. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी पत्नी अश्विनी सोशल मीडियावर लाईव्ह होती. डोळ्यासमोर पतीचा अंत झाल्याचे पाहून अश्विनीवर आभाळ कोसळले आहे.
गणेश यांच्याकडे केवळ एक एकर जमीन होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि आई-वडील भोळसर असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी गणेशच्या खांद्यावर होती. पत्राच्या शेडमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाने गरिबीतून बाहेर पडण्याचे स्वप्न पाहिले होते, पण या घटनेने तीन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले आहे.
कारखान्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह; 25 लाखांच्या मदतीची मागणी
कारखान्यावर वाहने उभी करण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने आणि मापासाठी तासनतास वाट पाहावी लागल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून, "अजितदादांनी या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारावे आणि पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत व घर बांधून द्यावे," अशी मागणी जोर धरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











