Pune Crime News : पुण्याच्या खडकी परिसरात एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली असून, यामुळे स्थानिक नागरिक हादरले आहेत. या प्रकरणी 56 वर्षीय दिलीप नांबुरी कंदाथिल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपली 53 वर्षीय पत्नी बिंदू कंदाथिल हिची राहत्या घरातच हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मनात आलं म्हणून महिलेला चाकूने भोसकले, बायकोसोबतच्या वादानंतर 'तो' का बनला सायको किलर?
ब्लँकेटने तोंड दाबून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे पथक चिखलवाडी येथील 'ओरियन कॉम्प्लेक्स'मधील त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले. तिथे बेडरूममध्ये बिंदू कंदाथिल यांचा मृतदेह आढळला. एफआयआरनुसार दिलीप याने ब्लँकेटने तोंड दाबून पत्नीची हत्या केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक संकटातून जात होता. रिअल इस्टेट व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्याच्यावर मोठे कर्ज झाले होते.
पत्नी नैराश्यात होती
आरोपीने असाही दावा केला की, त्याची पत्नी नैराश्यावर उपचार घेत होती आणि दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. आरोपीच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या घटस्फोटित पहिल्या पत्नीच्या संपर्कात असल्याचा संशय बिंदू यांना होता. याच संशयावरून घरात वारंवार भांडणे होत होती. आरोपीने सांगितले की, या सततच्या वादांमुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता आणि रागाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले.
हे ही वाचा : किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद! रागाच्या भरात तरुणाने थेट दगड डोक्यात घातला अन् नाल्यात फेकून...
'जबाबाच्या आधारे निष्कर्ष नाही'
मात्र, पोलीस या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत. केवळ आरोपीच्या जबाबाच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढला जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून पोस्ट मार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











