बीड - रोहिदास हातागळे : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर माणूस कोणतेही शिखर सर करता येऊ शकते. अंबाजोगाई तालुक्यातील पोलेवाडी येथील रामप्रभू बलभीम सातपुते यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. एका ऊसतोड कामगार मजुराने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून 'पोलीस उपनिरीक्षक' पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'त्या' निवडणुकीत आमचा पराभव, आम्हाला पुन्हा उमेदवारी द्यावी, मातोश्रीबाहेर 'तो' फोटो अन् रडारड
ऊसतोड कामगाराच्या मुलाची गगनभरारी
रामप्रभू यांचे वडील बलभीम गोपीनाथ सातपुते हे ऊसतोड कामगार आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. २०१० मध्ये रामप्रभू यांच्या मोठ्या भावाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संकटामुळे कुटुंब खचले होते, मात्र अशा कठीण काळातही सातपुते कुटुंबाने रामप्रभू यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
शिक्षणाचा प्रवास
प्राथमिक शिक्षण: पोलेवाडी (जि. प. शाळा).
माध्यमिक शिक्षण: पठाण मांडवा (10 वी पर्यंत).
उच्च शिक्षण: अंबाजोगाई येथून डी.एड. (D.Ed) पूर्ण केले.
शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे रामप्रभू यांनी वेळ वाया न घालवता एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पुण्यात किंवा मोठ्या शहरात जाऊन क्लास लावण्याची परिस्थिती नसतानाही त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. 2023 च्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले.
अमरावतीत नियुक्ती आणि गावात सत्कार,12 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर रामप्रभू सातपुते यांची नियुक्ती.
आता अमरावती येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून झाली आहे. आपल्या गावातील मुलगा फौजदार झाल्याचे समजताच पोलेवाडी ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
हे ही वाचा : मुंबई महापालिका : भाजपची 66 उमेदवारांची पहिली यादी, AB फॉर्मही दिले; पाहा सर्वांची नावं एका क्लिकवर
रामप्रभू बलभीम सातपुते काय म्हणाले?
"शिक्षक भरतीची वाट न पाहता मी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी ऊसतोड करून मला शिकवले, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे." असं रामप्रभू बलभीम सातपुते यांनी सांगितलं. यामुळे आता रामप्रभू बलभीम सातपुते हे ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परिक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ADVERTISEMENT











