बुलढाणा : शिवानीचा मर्डर केला म्हणून तिचे वडील अन् भाऊ तुरुंगात, पण ती जिवंत निघाली!

Buldhana Crime News : बुलढाणा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शिवानी नावाच्या तरुणीची हत्या केल्याप्रकरणी तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती. मात्र, ती तरुणी जिवंत असल्याचं समोर आलंय.

Buldhana Crime News

Buldhana Crime News

मुंबई तक

29 May 2026 (अपडेटेड: 29 May 2026, 04:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बुलढाणा : शिवानीचा मर्डर केला म्हणून ...

point

तिचे वडील अन् भाऊ तुरुंगात, पण ती जिवंत निघाली!

Buldhana Crime News, जका खान :  काही दिवसांपूर्वी बुलढाणा पोलिसांनी एका शिवानी नावाच्या तरुणीला मृत घोषित केलं होतं. पोलिसांनी तिचा मर्डर झाल्याचं सांगितलं आणि हत्येप्रकरणी शिवानीच्या वडिलांना आणि भावाला अटक झाली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मात्र, आता तीच शिवानी नावाची तरुणी आता जिवंत अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात...  

हे वाचलं का?

हेही वाचा : सरकारी कार्यालयातील महिलांच्या टॉयलेटमध्ये हिडन कॅमेरा.., अन् पुढे काय घडलं?

जळगाव जामोद तालुक्यात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तपास करताना पोलिसांनी डीएनए रिपोर्ट येण्याआधीच हत्या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता व आपली पाठ थोपटून घेतली होती. हा मृतदेह शिवानीचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र आता संपूर्ण प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे.

हेही वाचा : सरकारी कार्यालयातील महिलांच्या टॉयलेटमध्ये हिडन कॅमेरा.., अन् पुढे काय घडलं?

गेल्या महिन्यात 27 एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहापासून काही फुटांवर महिलेचे शीरही सापडले होते. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी मध्यप्रदेशातील खगणार पोलिसात शिवानी बापूराव कळमेकर ही तरुणी बेपत्ता असल्याचं जळगाव जामोद पोलिसांना कळलं आणि सापडलेला मृतदेह तिचाच असल्याचा व ओळख पटल्याचा दावा बुलढाणा पोलिसांनी केला. 

शिवानीची प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं 

 शिवानी बापुराम कळमेकर ही तरुणी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी आहे. शिवानी प्रियकरासोबत निघून गेली होती. त्यानंतर ती या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. दरम्यान, शिवानीचे कथित प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वादातून तिच्या वडिलांनी आणि भावानेच हत्या केल्याचा आरोप करत बुलढाणा पोलिसांनी मध्यप्रदेशातून या दोघांनाही अटक केली. त्यानंतर दोघांना बुलढाणा कारागृहात पाठवण्यात आले आहे. मात्र, आता या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे, कारण मृत घोषित करण्यात आलेली शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती तिच्या प्रियकरासोबत थेट खकणार पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. “मी जिवंत आहे आणि माझ्या हत्या प्रकरणात माझ्या वडील व भावाला चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं,” असा जबाब शिवानीने दिल्याचं समोर आलं आहे.

मग अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा आहे? 

या घटनेनंतर बुलढाणा आणि जळगाव जामोद पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, मृतदेहाची डीएनए तपासणी पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी हत्या प्रकरण उघडकीस आल्याचा दावा केला होता. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राजुरा धरण परिसरात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा? आणि निष्काळजीपणे केलेल्या तपासामुळे निर्दोष व्यक्तींना जेलमध्ये जावं लागलं  का? जर ते निर्दोष असतील तर त्यांची सुटका कधी होणार ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील म्हणाले की, अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याने डीएनए सॅम्पल एफएसएलला पाठवण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधित महिला जिवंत असल्याची माहिती आज मिळाली असून तिचा जबाब नोंदवला जात आहे. पोलिसांनी शिवानीच्या वडिलांना आणि भावाला जबरदस्ती गुन्हा कबुल करायला भाग पाडले, असा आरोप शिवानीच्या नातेवाईकांनी केला आहे. 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या प्रकरणात बोलताना म्हणाले, जळगाव जामोद प्रकरणाने राज्यातील पोलिसांचे वाभाडे निघाले आहेत. काय करत आहेत गृहमंत्री गृहराज्यमंत्री, तिकडचे पोलीस विशेष महानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांची चौकशी झाली पाहिजे. न केलेल्या गुन्ह्यात आदिवासी कुटुंबाला कारागृहात डांबून ठेवणे हा एक मोठा अपराध आहे. सरकारचा पोलिसांवर अजिबात वचक राहिलेला नाही. राज्यभरात अवैध धंदे डान्सबार ड्रगमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी अडकलेले आहेत.  कुठल्याही परिस्थितीत जळगाव जामोद मधील त्या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे व हे प्रकरण दबता कामा नये.