ADVERTISEMENT
Buldhana Crime News : मेहकर (जि. बुलढाणा) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बायकोला आणि 4 वर्षीय मुलाला संपवल्याची घटना मेहकर शहरात रविवारी रात्री घडली. गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर आणि अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून पतीने दोघांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय 30) आणि तिचा चार वर्षांचा मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी आरोपी पती राहुल हरी म्हस्के (वय 35) याच्याविरोधात मेहकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रूपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेने संशयातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
झोपेत असताना नवऱ्याकडून कुऱ्हाडीने वार करुन संपवलं
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना राहुल म्हस्के याने पत्नी रूपाली आणि मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. झोपेत असलेल्या दोघांच्या डोक्यावर घाव घालण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या आरडाओरडीतून घरातील इतर सदस्यांची झोपमोड झाली. आरडाओरडीचा आवाज ऐकताच आरोपीची आई ताराबाई म्हस्के यांना जाग आली. घरात घडलेला प्रकार पाहून त्या हादरून गेल्या. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घरात दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. जखमी अवस्थेत असलेल्या रूपाली यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
हेही वाचा : BMC Election: रात्री प्रचंड मोठ्या घडामोडी, शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपने केली 'ती' घोषणा!
मात्र, उपचार सुरू असतानाच रूपाली यांचा मृत्यू झाला. चार वर्षांचा रियांशही या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्यालाही वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याचा देखील मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेहकर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीकडून असा टोकाचा निर्णय घेतला गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. निष्पाप चिमुकल्याचा या वादात बळी गेल्याने या घटनेची तीव्रता अधिकच वाढली असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











