Son Killed Father : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील सिल्क मिल कॉलनी परिसरात मालमत्तेच्या वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पटेल जफर करीमोद्दीन असे मृत पित्याचे नाव असून, या हल्ल्यात त्यांची मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
मालमत्तेवरुन वडिलांशी वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पटेल जफर करीमोद्दीन आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहमान अब्दुल जफर यांच्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मालमत्तेवरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते, जिथे निकाल जफर यांच्या बाजूने लागला. न्यायालयाच्या आदेशानुसार, तहसील प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत वादातील भूखंडाचा ताबा जफर यांना देण्यात आला होता. आपल्या विरोधात निकाल गेल्याचा राग आरोपी अब्दुल रहमान अब्दुल जफरच्या मनात होता.
हे ही वाचा : काळजाचा थरकाप उडवणारी घटना, सांगलीत 13 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात झाडली गोळी!
चाकूने केले सपासप वार
घटनेच्या दिवशी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास जफर करीमोद्दीन हे आपल्या मुलीसोबत भूखंडाचा ताबा घेऊन घरी परतत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अब्दुलने त्यांचा पाठलाग करून त्यांची गाडी अडवली आणि चाकूने सपासप वार केले. वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या बहिणीवरही त्याने निर्घृण हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान जफर यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : 'आम्ही मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत...' प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बोलली, डॉ. सेजल पवारबाबत KEM चा मोठा निर्णय
आरोपीने खाल्ल्या झोपेच्या गोळ्या
हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. रात्री नऊच्या सुमारास मिटमिटा भागातील एका नातेवाईकाच्या घरातून आरोपी अब्दुलला ताब्यात घेण्यात आले. पकडले जाण्यापूर्वी त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा एमआर म्हणून काम करत असून परिसरात त्याला 'डॉक्टर' नावाने ओळखले जात होते. याप्रकरणी सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











