श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका; आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो फोडला

Gauri Palave suicide case : श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका; आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो फोडला

Gauri Palave suicide case

Gauri Palave suicide case

मुंबई तक

24 Nov 2025 (अपडेटेड: 24 Nov 2025, 11:23 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका

point

आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी टाहो फोडला

Gauri Palave suicide case : मुंबईत डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणावरून राजकीय, सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी असलेल्या गौरीने शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेनंतर आरोपी अनंत गर्जे हा वरळी पोलीस ठाण्यात हजर झालाय.. आज तिचे पार्थिव नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवडे गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले.

हे वाचलं का?

पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी गावकऱ्यांची, नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पार्थिवासमोर रडत-ओरडत त्यांनी “जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या… श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका,” अशी भावना व्यक्त करत हंबरडा फोडला. त्यांच्या या वेदनादायी उद्गारांमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले. दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण होताच पाथर्डी पोलिसांनी गावात तळ ठोकत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

नातेवाईकांनी अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीच्या अंत्यसंस्कारांचा हट्ट धरत संताप व्यक्त केला. “गौरीला त्रास देऊन आत्महत्येला प्रवृत्त केले,” असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला अटक, वरळी पोलीस ठाण्यात स्वत: हजर, म्हणाला...

शनिवारी घडलेल्या घटनेनंतर वरळी पोलिसांनी रविवारी अनंत गर्जेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासाला सहकार्य करण्यासाठी अनंत गर्जे 24 तारखेच्या मध्यरात्री स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला. “कायद्याची प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून मी स्वखुशीने हजर झालो,” असे त्याने पोलिसांना सांगितले असल्याचे समजते.

गौरी मूळची बीड जिल्ह्यातील. तिचे वडील वैद्यकीय योग प्रशिक्षक तर आई परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. बीडीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरीने प्रथम सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डेंटल असिस्टंट म्हणून सेवा दिली. त्यानंतर ती सायन हॉस्पिटलमध्ये डेंटल सर्जन म्हणून कार्यरत होती. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच अनंत आणि गौरी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नानंतर वरळीत दोघे राहात होते. पण काही महिन्यांतच त्यांच्या नात्यात तणाव वाढू लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

कुटुंबाच्या माहितीनुसार, अनंतचे अनैतिक संबंध असल्याची माहिती गौरीला मिळाली होती. त्यावरून दोघांत वारंवार वाद होत होते. गेल्या काही आठवड्यांत गौरी मानसिकदृष्ट्या खचल्याचेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री अनंतचे दोन मिस कॉल आल्यानंतर गौरीच्या वडिलांनी तिला संपर्क केला तेव्हा ती सर्व ठीक असल्याचे सांगितले. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वतः अनंतनेच “गौरी सुसाइड करतेय, तिला समजवा,” असे सांगितल्याचा गौरीच्या वडिलांचा दावा आहे. फोनवर बोलण्यास सांगितले असता अनंतने फोन न दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गौरीचा मामा शिवदास गर्जे यांनी “ही आत्महत्या नसून हत्या आहे,” असा गंभीर संशय उपस्थित केला आहे. “जर गौरी गळफास घेत होती तर त्याने तिला थांबवले का नाही? आणि तिची प्रकृती बिघडली म्हणतो, तर घटनास्थळावरून तो पळून का गेला?” असा सवाल त्यांनी केला. प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मासिक पाळी आल्याने आईने मुलीला दोन वर्षे अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं, धक्कादायक प्रकाराने पोलिसही हादरले

    follow whatsapp