Samruddhi Highway Accident Death: गौरव साळी, जालना: जालना जिल्ह्यातून एका भीषण रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मजुरांना घेऊन जाणारा एक मिनी-पिकअप ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना हा अपघात झाला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व महिला समृद्धी महामार्गावरील मजूर होत्या आणि त्या वाहनातून प्रवास करत होत्या. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले, आणि जखमींना प्रथम जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निष्काळजीपणामुळे अपघात, चालक ताब्यात
प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोक पसरला असून स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षा आणि अतिवेगाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा>> Maharashtra Weather : राज्यातील 'या' 27 जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार, हवामान विभागाचा अलर्ट
दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी शासकीय मदतीचे आश्वासन दिले.
प्रशासनाकडून पाहणी, तपास सुरू
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनीही घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने तपास अधिक तीव्र केला आहे.
पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातात सात जणांचा बळी गेला असून, संपूर्ण जालना जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
हे ही वाचा>> सातारा सिव्हिल रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर, मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून अंत्यसंस्कार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
जखमींवर एका खासगी रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी सांगितले की, सर्व जखमींना मोफत उपचार मिळतील आणि संबंधित कंत्राटदार हा मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही देईल. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सध्या संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण असून, प्रशासन मदतकार्य वेगाने करत आहे.
मृत आणि जखमींची ओळख
अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख अलकाबाई दादाराव अदमाने (वय 45), लक्ष्मीबाई संतोष मदन (वय 35), मीनाबाई परमेश्वर अदमाने (वय 45), कांचनबाई प्रकाश अदमाने (वय 50), ताराबाई गहेनाजी चौधरी (वय 60), कडुबाई रामदास मदन (वय 55), सुमनबाई कचरू अदमाने (वय 70) आणि मंगलाबाई शिंगारे अशी पटली आहे.
जखमींमध्ये, प्रयागबाई बाबासाहेब वाघ (वय 30) यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे, कविता विठ्ठल चौधरी (वय 35) आणि दिनेश रंगनाथ गायकवाड (वय 42) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तसेच एका अज्ञात महिलेच्या (वय 50) डोक्यालाही दुखापत झाली आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT











