IAS officer Tukaram Mundhe Speech : अमरावती येथे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या आयुष्यातील 21 वर्षांपूर्वीचा एक भावूक आणि प्रेरणादायी अनुभव सांगितला. 2005 मध्ये यूपीएससीचा अंतिम निकाल लागल्यानंतर अवघ्या एका क्षणात समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. "3 वाजून 59 मिनिटांपर्यंत मला 'तुकाराम' म्हणून हाक मारली जात होती आणि चार वाजता निकाल लागल्यानंतर 'सर' म्हणून संबोधलं जाऊ लागलं," असे सांगत त्यांनी पदापेक्षा विचार, आचरण आणि मूल्ये अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. यश मिळाल्यानंतरही आपल्या तत्त्वांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नये, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : राहुल गांधींनी ‘Gen Z’ साठी केलेलं K-Pop स्टाइल आहे तरी काय? Friendship Day निमित्त खास शुभेच्छा!
मुंढे यांनी सांगितले की, यूपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर मसुरी येथील प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. त्याच काळात ते अमरावतीतही आले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली एक विद्यार्थिनी त्यावेळी चौथी-पाचवीत होती. त्या भाषणातून प्रेरणा घेऊन तिने यूपीएससी करण्याचा निर्धार केला आणि काही वर्षांपूर्वी तिची इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये निवड झाली, अशी आठवण त्यांनी सांगितली. मात्र त्या यशाचे श्रेय स्वतःला नसून त्या विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना असल्याचे नमूद करत त्यांनी प्रेरणा ही कृतीतूनच सिद्ध होते, असे सांगितले. याच वेळी त्यांनी स्वतःच्या अपयशाचाही उल्लेख केला. 1997, 1998 आणि 1999 मध्ये यूपीएससीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचूनही अंतिम यश मिळाले नव्हते. त्यानंतर एमपीएससी, नोकरी आणि लेक्चरशिप करत अखेर 2005 मध्ये यूपीएससीत यश मिळाल्याचे सांगत त्यांनी यशामागील संघर्ष समजून घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : Personal Finance: जुना फ्लॅट विकताना कोणत्या चुकांमुळे होतं सर्वाधिक नुकसान?
मोबाईल वापरणे चुकीचे नसून मोबाईलवर आपला ताबा असणे महत्त्वाचे - तुकाराम मुंढे
आजच्या डिजिटल युगात माहिती आणि ज्ञान सहज उपलब्ध असले तरी विवेकाची कमतरता निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया आणि अल्गोरिदममुळे तरुण सतत तुलना, न्यूनगंड आणि मानसिक तणावाच्या गर्तेत अडकत असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल वापरणे चुकीचे नसून मोबाईलवर आपला ताबा असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. रील्स आणि सोशल मीडियावर दिसणारे यश हे अनेक अपयशानंतर घडलेले असते, मात्र लोकांसमोर केवळ यशाचा भाग येतो. त्यामुळे इतरांशी तुलना करून चुकीचे निर्णय घेऊ नयेत, असा सल्ला त्यांनी दिला. ज्ञानापेक्षा विवेक अधिक महत्त्वाचा असून माहिती, ज्ञान आणि विवेक यातील फरक ओळखणे हीच आजच्या पिढीची खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यश हे मोठ्या पगारात किंवा मोठ्या घरात नसून सकारात्मक बदल घडवण्यात आहे - तुकाराम मुंढे
लोकशाही, नैतिकता आणि समाजातील जबाबदारी यांवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले. मतदानाचा अधिकार हा केवळ मतदानापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाने जागरूक नागरिक म्हणून वागण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोठा आवाज नव्हे तर मोठा विचार समाज घडवतो, असे सांगत त्यांनी सोशल मीडियावरील माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याचे आवाहन केले. संत परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समाजसुधारकांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी नैतिकता, विवेक आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती जोपासण्याचा संदेश दिला. यश हे मोठ्या पगारात किंवा मोठ्या घरात नसून समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात आहे, असे सांगत त्यांनी तरुणांनी स्वतःसाठी थांबून विचार करावा, समाजासाठी काम करावे आणि विवेकाच्या आधारावर भविष्य घडवावे, असे आवाहन करून भाषणाचा समारोप केला.
ADVERTISEMENT












