Amravati Crime News : पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात एकच संतापाची लाट पसरली आहे. सासरच्या व्यक्तींनी हुंड्यासाठी छळ केल्याने वैष्णवीने गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवल्याचं समजते. ही घटना ताजी असतानाच अमरावती येथेही धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी मानसिक छळ केल्याने 32 वर्षीय महिला आरोग्य अधिकाऱ्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही भयंकर घटना अमरावतीच्या तपोवन परिसरातील जयभोले कॉलनीत घडली. शुभांगी निलेश तायवडे असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला सीएचओ (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) या पदावर कार्यरत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथे राहणाऱ्या शुभांगीचं लग्न नोव्हेंबर 2011 मध्ये निलेश तायवडे याच्याशी झालं होतं. निलेश एक बँक मॅनेजर आहे. शुभांगीला दोन मुली आहेत. पीडित कुटुंबियांनी आरोप केला आहे की, दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने शुभांगीचा पती, सासू, दीर, नणंद आणि त्यांच्या एका मित्राने शुभांगीचा मानसिक छळ केला.
हे ही वाचा >> पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपलं, प्रवाशांची उडाली दाणादाण, फोटो आले समोर
या जाचाला कंटाळून शुभांगीने रविवारी सकाळी 9 वाजता रहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.घटनेची माहिती मिळताच शुभांगीचे वडील राजेंद्र तुरकणे (65) यांनी गडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पती निलेश तायडे, सासू, निलेशचा भाऊ नितिन तायवडे आणि नणंद हतुर्णा, नितिनचा मित्र नयन रामटेके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
शुभांगीने जीवन संपवण्याच्या एक दिवस आधी 24 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता तिच्या वडिलांना संपर्क केला. सासरच्या घरी होत असलेल्या छळाबद्दल शुभांगीने तिच्या वडिलांना सांगितलं. शुभांगीने रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास कुटुंबियांना आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. कुटुंबीय जेव्हा तिच्या घरी पोहोचले, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT
