मीरा रोडमधील उच्चभ्रू सोसायटीत पिटबुल कुत्र्याचा भयंकर हल्ला; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मीरा रोड येथील एका मोठ्या आणि उच्चभ्रू गृहनिर्माण संकुलात पाळीव कुत्र्याने आपल्या संरक्षकावर (हँडलर) हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

incident involving an attack by a pitbull mix dog at a housing complex in mira road atmosphere of fear among residents

प्रातिनिधिक फोटो

मुंबई तक

• 08:31 PM • 25 Jun 2026

follow google news

मीरा रोड: मीरा रोड येथील एका मोठ्या आणि उच्चभ्रू गृहनिर्माण संकुलात पाळीव कुत्र्याने आपल्या संरक्षकावर (हँडलर) हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. 23 जून रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा दावा स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर संकुलातील रहिवाशांमध्ये, विशेषतः लहान मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुत्रा हा "पिटबुल मिक्स" जातीचा असल्याचे सांगितले जात आहे. नियमितपणे फिरण्यासाठी बाहेर नेण्यात येत असताना या कुत्र्याने त्याच्याच संरक्षकाला चावा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे विशेषत: लहान मुलं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा>> मुंबई लोकलमध्ये मर्डर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं

सदर गृहनिर्माण संकुलात सुमारे 400 हून अधिक कुटुंबे वास्तव्यास असून मोठ्या संख्येने लहान मुले संकुलाच्या आवारात खेळत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रहिवाशांनी या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, संकुलाच्या परिसरात सुमारे आठ भटके कुत्रेही वावरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही प्राणीप्रेमी त्यांची देखभाल करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, यापूर्वीही या भटक्या कुत्र्यांकडून काही रहिवासी आणि मुलांचा पाठलाग करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

हे ही वाचा>> 'तू मला सोडून का गेलास?' केतनची हत्या केल्यानंतर सियाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

रहिवाशांच्या मते, यापूर्वी अशा स्वरूपाच्या काही घटना घडूनही सोसायटी व्यवस्थापन समितीकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित सोसायटी व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन तसेच प्राणी कल्याणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. विशेषतः मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन होत आहे का, याची पडताळणी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत संबंधित कुत्र्याच्या मालकाची किंवा सोसायटी व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्यास पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना होऊ शकतात, अशी आशा रहिवासी व्यक्त करत आहेत.