Dombivli News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच, आता कल्याण पूर्व येथील भानु ज्योत रुग्णालयात एका डॉक्टरला रुग्णाच्या मुलाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाला उपचाराविषयी माहिती देत असताना झालेल्या क्षुल्लक वादातून ही हिंसक घटना घडली असून, यामुळे स्थानिक वैद्यकीय वर्गात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
घटना सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे बरगडीला दुखापत झालेल्या जयवंत देशमुख या रुग्णावर उपचार करत होते. रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णाला उपचारांची आणि औषधांची माहिती समजावून सांगत असताना, रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख याने केबिनमध्ये प्रवेश केला आणि डॉक्टरांशी एकेरी भाषेत उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. रुग्णाने स्वतः आपल्या मुलाला बाहेर जाण्यास सांगितले असले तरी, काही वेळातच विनीतने पुन्हा आत येऊन डॉक्टर जयस्वाल यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ही सर्व घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडने कारवर 3,400 वेळा केले किस, Video व्हायरल
आरोपी फरार
याप्रकरणी कोलसेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस ॲक्ट (कलम 3 व 4) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी विनीत देशमुख फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत, अशी माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) सुहास हेमाडे यांनी दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, "आम्ही रात्रंदिवस मेहनत करून रुग्णांचे प्राण वाचवतो, अशा वेळी आमच्यावर होणारे हल्ले अत्यंत दुर्दैवी आहेत," अशी उद्विग्नता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : पीडितेला जंगलात नेत जिप्सीला बांधून केले अत्याचार, घरी परतल्यानंतर सांगितला घटनाक्रम
कठोर कारवाईची मागणी
काही दिवसांपूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर लगेचच कल्याणमध्ये डॉक्टरवर हल्ला झाल्यामुळे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आणि सरकारने कडक सुरक्षा पुरवावी तसेच आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी आरोग्य वर्गाकडून जोर धरत आहे.
ADVERTISEMENT












