Kolhapur Crime, मलकापूर : एका महिला कर्मचाऱ्याला बदनामीची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील नायगाव येथे कार्यरत असलेल्या संदीप प्रकाश पाटील (वय 43, रा. टेकोली, ता. शाहूवाडी , सध्या व्ही आनंद इम्पायर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व) या पोलिसाविरोधात शाहूवाडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी त्याला नायगावहून ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
ब्लॅकमेलिंग करुन शारीरीक संबंध अन् लाखो रुपये उकळले
पीडित महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाटील याने आपल्या पदाचा गैरवापर करत तिच्यावर मानसिक दडपण आणले. वेळोवेळी अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. ही धमकी कायम ठेवत त्याने तिला कोल्हापूर बसस्थानक परिसरात भेटायला बोलावले तसेच विविध ठिकाणी जबरदस्तीने भेटण्यास भाग पाडले. धमक्यांच्या आधारे आरोपीने तिच्याकडील दागिने घेण्याचा डावही रचला. भीतीपोटी पीडिता चार तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे मनीमंगळसूत्र आणि एक तोळ्याचा नेकलेस घेऊन बजागेवाडी येथे आरोपीला भेटायला गेली. पाटीलने तिच्याकडील सर्व दागिने ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यातूनही समाधान न मानता आरोपी सातत्याने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मोठ्या रकमेची मागणी करत राहिला. त्याच्या छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेने कर्ज काढून तब्बल 6 लाख 45 हजार रुपये आरोपीला दिले. एवढ्यावरही न थांबता, पाटीलने पीडितेचा मोबाइल फोडून तिच्या सिमकार्डवरील फोटो व व्हिडीओ पोलिस खात्यातील इतर महिला कर्मचाऱ्यांना पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने आरोपीकडे पैसे परत देण्याची आणि तिच्या मोबाइलमधील सर्व खासगी व्हिडीओ हटविण्याची वारंवार मागणी केली. मात्र आरोपीने तिच्या कोणत्याही विनंतीला प्रतिसाद दिला नाही. अखेर अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि धमक्या यांना कंटाळून पीडितेने शाहूवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच शाहूवाडी पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि संदीप पाटील याला मुंबई नायगाव येथून अटक करण्यात आली. सद्यस्थितीत पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे पदाचा गैरवापर करून महिला कर्मचाऱ्यावर सतत दबाव ठेवत अत्याचार केल्याने या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











