कोल्हापूर : “माझं लग्न कधी लावून देणार?” असा प्रश्न विचारला आणि मुलाचा आईसोबत वाद झाला. याच क्षुल्लक कारणावरून मुलाने स्वतःच्या आईवर विळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आईच्या हाताच्या बोटाचा काही भाग तुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहापूर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
कोरोची (ता. हातकणंगले) येथील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या गेजगे कुटुंबात बुधवारी दुपारी ही घटना घडली. सुरेखा दादू गेजगे (वय 45) या आपल्या पती, तीन मुले, सुना आणि नातवंडांसह एकाच घरात राहतात. कुटुंबातील सर्व सदस्य दुपारी साधारण अडीचच्या सुमारास जेवणासाठी बसले होते. त्यावेळी वैभव गेजगे (वय 24) याने अचानक आईला लग्न लावून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला आणि त्यातून वादाला सुरुवात झाली.
वाद चिघळत जाताच वैभवचा राग अनावर झाला. स्वयंपाकघरात जवळच ठेवलेली कांदा कापण्याची विळी त्याने संतापाच्या भरात उचलली आणि थेट आईच्या हातावर वार केला. तीक्ष्ण वारामुळे सुरेखा यांच्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. रक्तस्त्राव सुरू होताच कुटुंबियांनी तात्काळ सुरेखा यांना हातकणंगले येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
हल्ल्यानंतर वैभव घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच त्याला अटक केली. सुरेखा गेजगे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वैभवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
स्थानिकांमध्ये या प्रकारामुळे संताप आणि धक्का व्यक्त केला जात आहे. कुटुंबातील किरकोळ वादातून असा हिंसक हल्ला घडल्याने समाजातील वाढत्या तणावपूर्ण वातावरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची चौकशी सुरू असून त्याने हल्ला का केला, मानसिक अवस्थेचा काही संबंध आहे का, याबाबत तपास केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











