सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाले... कल्याणच्या रौनक सिटीत 19 व्या मजल्यावरून उडी घेऊन 8 वीत शिकणाऱ्या पीडितेची आत्महत्या!
कल्याणमधील रौनक सिटी सोसायटी परिसरात एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाल्याने 14 वर्षीय विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल
19 व्या मजल्यावरून उडी घेऊन 8 वीत शिकणाऱ्या पीडितेची आत्महत्या!
कल्याणच्या रौनक सिटी परिसरात घडली धक्कादायक घटना
कल्याण: कल्याण पश्चिम येथील हाय-प्रोफाइल रौनक सिटी सोसायटी परिसरात काल (13 नोव्हेंबर) धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नेमकं प्रकरण काय?
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्य...
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील अल्पवयीन पीडितेचं नाव रिद्धी खराडे असून ती इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. शाळेत नुकत्याच झालेल्या सत्र परीक्षेत रिद्धीला कमी गुण मिळाले होते आणि यामुळेच ती मानसिक तणावात होती. दिवाळीच्या आधी शाळेत झालेल्या सहामाही परीक्षेत पीडितेला खूपच कमी गुण मिळाल्याने ती खूपच अस्वस्थ झाली होती. शैक्षणिक प्रगती होत नसल्याने अल्पवयीन पीडिता मानसिक तणावात गेली आणि तिने टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: बिहार विधानसभा निवडणुकीबाबत सट्टा बाजारात भलताच अंदाज, भाजपच्या अडचणी वाढणार.. गेम फिरणार?
19 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
घटनेतील मृत मुलगी ही शाळेत ओपन डे असल्याकारणाने दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिच्या घरी गेली. घरी पोहोचल्यानंतर, ती खूपच अस्वस्थ दिसत होती. अशातच, पीडितेने तिच्या घरच्यांना शाळेत दिवाळीपूर्वी झालेल्या सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाल्याचं सांगितलं. त्यावेळी, आपली मोठी बहीण समोर असताना पीडितेने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. परीक्षेत खूपच कमी मार्क्स मिळालेल्या 8 वीत शिकणाऱ्या रिद्धी खराडे हिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा: दिल्ली स्फोटातील संशयित आरोपी डॉ. उमरचे घर केलं जमीनदोस्त, सुरक्षा दलाची कारवाई, नेमकं काय घडलं?
घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
संबंधित घटनेची माहिती मिळताच, खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलीस आता या घटनेच्या तपासाची दिशा ठरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रकरणामुळे संपूर्ण रौनक सिटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










