Ashok Kharat News, प्रवीण ठाकरे : राज्यात सुरू असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात 850 पेक्षा अधिक शिक्षकांसह शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या घोटाळ्यात भोंदूबाबा खरात याचाही मोठा सहभाग समोर आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अशोक खरात यांच्या घनिष्ट संबंधांवर आणि खरातच्या भावाला मिळालेला 'शालार्थ आयडी' यावर आता संशय उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
दीपक केसरकर शिक्षणमंत्री झाल्यानंतर
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर या दोघांमधील कनेक्शनवर सुषमा अंधारे यांनी फोटोसह गंभीर आरोप केले होते, अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागांव पिंपरी येथील शाळेत शिक्षक आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये जेव्हा दीपक केसरकर शिक्षणमंत्री झाले, त्याच काळात दिलीप खरात यांना 'शालार्थ आयडी' बहाल करण्यात आला. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मंत्रालयातून हे काम झाल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय.
2009 पासून विनाअनुदान तत्वावर कार्यरत दिलीप खरात यांना अचानक आयडी मिळाल्याने त्यांच्याच शाळेतील अनेक ज्येष्ठ शिक्षक नाराज झाले. ज्यांनी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली, त्यांना डावलून खरातच्या भावाला प्राथमिकता मिळाल्याने काही शिक्षकांनी वेतन पथकासमोर आंदोलनही केलं. मात्र, हे प्रकरण तापू नये म्हणून भोंदूबाबा अशोक खरातने ओळख वापरून इतर काही शिक्षकांच्या फाईल्सही मार्गी लावल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा
भोंदू खरातच्या भावाला मिळाला आयडी
शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता दिलीप खरात हे विनाअनुदानित तत्वावर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात काम करत होते, नंतर त्या कनिष्ठ महाविद्यालयाला 20 % अनुदान सुरू झाले. त्याच दरम्यान दिलीप खरात यास शालार्थ आयडी मिळाला. नंतर 40% तर आता 60% अनुदान या संस्थेला आहे. शैक्षणिक संस्थेने मात्र सेवाज्येष्ठता डावलून खरात यांस आयडी दिला असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : अशोक खरातच्या अश्लील Video मुळे 'ती' भीती... पीडितेच्या कुटुंबीयांना मागितलं Work from Home
'न्यायप्रविष्ट असल्याने बोलणार नाही'
नाशिक शिक्षण विभागात याची नोंद आहे. मात्र विनाअनुदानित वरून अनुदानित तत्वावर खरातची नेमणूक झाल्याबाबत निश्चित माहिती नाशिक विभाग शिक्षण कार्यालय देऊ शकले नाही. याबाबत दिलीप खरात यांच्याशी संपर्क साधला असता ते सिन्नर बाहेर होते. त्यांनी सांगितलं की, अशोक खरात यांच्याशी खूप संबंध येत नाही. मी 2009 सालापासून विना वेतन 15 वर्ष काम केले. आता कुठे अनुदान सुरू झाले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी अधिक बोलणार नाही.
एकीकडे भोंदूगिरीचे आरोप आणि दुसरीकडे मंत्रालयातील बड्या नेत्यांशी असलेले आर्थिक आणि प्रशासकीय संबंध या चक्रव्यूहात आता दीपक केसरकर यांची भूमिकाही संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात अजून काय समोर येते हे बघणे गरजेचे आहे.
ADVERTISEMENT











