Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 10:52 AM)

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील पाच दिवस वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला

point

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात धडकणार?

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस हवामानाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात माहिती देताना राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असे सांगितले आहे. काही भागांमध्ये ताशी 40 ते 50 किमी, तर काही ठिकाणी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामान राहू शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच नागरिकांनी विजांच्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Pune Metro : हिंजवडीतील IT कंपनीने रातोरात गाशा गुंडाळला, अन् 700 तरुण रस्त्यावर

कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट? 

आजच्या दिवसासाठी कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशीव, संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर तुफानी संकट, 23 जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता

चार तारखेला राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, नांदेड, लातूर, धाराशीव, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पाच तारखेला विदर्भात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो. त्याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट लागू राहणार आहे.

मुंबई आणि पुण्याच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास पुणे जिल्हा येलो अलर्टवर आहे. मुंबईत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र इतर काही जिल्ह्यांप्रमाणे अतिवृष्टीसदृश परिस्थिती मुंबईत निर्माण होण्याची शक्यता सध्या नसल्याचे सांगण्यात आले आहे. सहा तारखेला पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना तसेच दक्षिण महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा इशारा कायम राहणार आहे. राज्यातील इतर भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.