Maharashtra Weather : महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. रात्रीच्या तापमानात घट होत असून सकाळच्या वेळी गारवा जाणवू लागला आहे. मात्र, थंडीचा हा परिणाम केवळ दैनंदिन जीवनावर होत नसून शहरांमधील हवेच्या गुणवत्तेवरही होत आहे. हिवाळ्यात अनेकदा सकाळच्या वेळी शहरांमध्ये धुरकट वातावरण पाहायला मिळतं. तापमान कमी झाल्यानंतर हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI खराब होण्याची शक्यता वाढते. यामागे केवळ वाहनांचा धूर किंवा बांधकामांमधून उडणारी धूळ ही कारणं नसतात, तर हवामानातील बदलांचाही मोठा वाटा असतो. वाऱ्याचा वेग कमी होणे, वातावरण स्थिर राहणे आणि तापमान उलट्या थरांची स्थिती म्हणजेच टेम्परेचर इन्व्हर्जन यामुळे प्रदूषक जमिनीजवळ अडकून राहू शकतात. त्यामुळे मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्याचा धोका निर्माण होतो.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: फ्लॅट खरेदी करताना पैसे वाचवण्याच्या भन्नाट आयडिया
प्रदूषक एका ठिकाणी साचून राहत नाहीत?
सामान्यपणे जमिनीजवळची हवा गरम झाल्यानंतर हलकी होऊन वरच्या दिशेने जाते. त्यामुळे वातावरणात हवेची हालचाल सुरू राहते आणि प्रदूषक एका ठिकाणी साचून राहत नाहीत. मात्र, हिवाळ्यात काही वेळा याच्या उलट परिस्थिती निर्माण होते. जमिनीजवळ थंड हवेचा थर तयार होतो आणि त्याच्या वर तुलनेने उष्ण हवेचा थर असतो. या स्थितीला टेम्परेचर इन्व्हर्जन असं म्हणतात. त्यामुळे जमिनीजवळील थंड हवेला वर जाण्यास मर्यादा येतात. परिणामी वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ आणि इतर प्रदूषक जमिनीजवळच अडकून राहतात. त्यात वाऱ्याचा वेगही कमी असेल तर प्रदूषकांना पसरून जाण्यास पुरेशी मदत मिळत नाही. त्यामुळे शहरांमधील हवेची गुणवत्ता खराब होऊ शकते. म्हणजेच प्रदूषण किती निर्माण होतं याबरोबरच ते वातावरणात किती वेगाने पसरतं, हेही AQI ठरण्यासाठी महत्त्वाचं असतं.
हेही वाचा : Pune: मंदार किवळेवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांचा भाजपला सवाल; 'नव्या पुण्याचे शिल्पकार काय बोलणार?'
थंडीचा प्रत्येक पिकाला फायदा होतो असं नाही
दुसरीकडे, हिवाळ्यातील थंडी शेतीसाठी काही प्रमाणात अनुकूल ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या रब्बी हंगाम सुरू असून गहू, हरभरा यांसारखी पिकं घेतली जात आहेत. गव्हाच्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी थंड हवामान उपयुक्त ठरतं. योग्य तापमानामुळे पिकाला फुटवे येण्यास मदत होते. मात्र, दाणे भरण्याच्या काळात अचानक तापमान वाढल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. हरभरा पिकालाही थंड आणि कोरडं हवामान अनुकूल असतं. मात्र, फुलं येण्याच्या आणि शेंगा लागण्याच्या काळात तापमानात मोठे बदल झाल्यास पिकावर ताण येऊ शकतो. कांद्याच्या पिकाची वाढ, पातींची वाढ आणि कांदा तयार होण्याच्या प्रक्रियेवरही तापमान आणि पाण्याच्या उपलब्धतेचा परिणाम होतो. त्यामुळे थंडीचा प्रत्येक पिकाला फायदा होतो असं नाही. पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार तापमान योग्य असणं महत्त्वाचं ठरतं.
दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली. जळगावमध्ये किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं, तर पुण्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मुंबईतही नोव्हेंबर महिन्यात दशकातील दुसऱ्या सर्वात थंड पहाटेची नोंद झाली होती. सांताक्रूझमध्ये तापमान 16.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. मात्र, वाऱ्याची दिशा बदलणे, समुद्राकडून येणारी हवा आणि इतर हवामान प्रणालींमुळे तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील अनेक भागांमध्ये पुढील आठवड्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. काही भागांत दिवसाचं तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं. एकीकडे थंडीमुळे शहरांमध्ये प्रदूषण वाढण्याचा धोका असताना दुसरीकडे योग्य तापमानामुळे रब्बी पिकांना मदत होऊ शकते. त्यामुळे तापमान, वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील बदलांचा परिणाम शहरांमधील हवेची गुणवत्ता आणि शेती या दोन्ही क्षेत्रांवर होत असल्याचं दिसून येतं.
ADVERTISEMENT












