Pune: मंदार किवळेवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांचा भाजपला सवाल; 'नव्या पुण्याचे शिल्पकार काय बोलणार?'
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. पुणे गुन्हेगारांचं आवडतं घर झाल्याची टीका करत त्यांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारवर टीका केली आहे. एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारांचे आवडते ठिकाण बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दोन-चार गुंडांना पकडून बॅनरबाजी करणाऱ्या 'नव्या पुण्याचे शिल्पकार' या घटनेवर काय उत्तर देणार? असा सवाल विचारत रोहित पवारांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.
“पुणे गुन्हेगारांचं आवडतं घर झालंय!”
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जिथं न्याय मिळतो त्या न्यायालयाच्या दारातच गँगवार झाल्याची घटना आज पुण्यात घडली. यावरूनच राज्याची कायदा-सुव्यवस्था किती पोकळ झालीये हे दिसून येतंय."
हे ही वाचा>> पुणे: कोयत्याने अक्षरश: हात तोडले.. कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेचं नेमकं झालं तरी काय?
पुढे त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधताना पुण्याच्या बदलत्या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केला. "एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे भाजपच्या काळात गुन्हेगारांचं आवडतं घर झालंय ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही," अशी टीका त्यांनी केली.
'नव्या पुण्याच्या शिल्पकारां'ना रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केला. "असो, 2-4 गुंडाना पकडून बॅनरबाजी करणारे नव पुण्याचे शिल्पकार यावर काय बोलणार?" असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
हे ही वाचा>> पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?
नेमकी घटना काय घडली?
पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी सुमारे 1.15 वाजता मंदार किवळे याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. प्राथमिक तपासानुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणाबाहेर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता रोहित पवार यांच्या टीकेनंतर राज्य सरकार आणि भाजपचे स्थानिक नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
