Marathi Actor Sachin Chandwade suicide : मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील उदयोन्मुख अभिनेता सचिन चांदवडे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे घडली. अवघ्या २५ वर्षांच्या सचिनने आत्महत्येचा मार्ग निवडल्याने त्याच्या कुटुंबावर, चाहत्यांवर आणि मराठी कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चांदवडेने आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांना ही घटना लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्रकृती खालवल्याने त्याला धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
सचिन मूळचा जळगाव जिल्ह्यातील असून तो व्यावसायिकदृष्ट्या इंजिनिअर होता. त्याने पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी स्वीकारली होती. परंतु बालपणापासूनच त्याला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळे नोकरीसह तो मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याच्या मेहनतीमुळे आणि कलात्मकतेमुळे त्याने काही काळातच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा : 'दोन उद्योगपतींची मुंबईवर नजर, अमित शाह 'अॅनाकोंडा'! उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघाती हल्ला
सचिनने अभिनय केलेला ‘असुरवन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्याने या सिनेमाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या सिनेमात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं होतं. त्याशिवाय तो ‘जमतारा 2’ या लोकप्रिय वेब सिरीजमध्येही झळकला होता. छोट्या पडद्यावर आणि डिजिटल माध्यमात पाऊल ठेवत असताना त्याने स्वतःचं करिअर घडवण्यासाठी मोठी झुंज दिली होती. त्याच्या आकस्मिक निधनाने सहकलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
सचिनच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून नैराश्य, वैयक्तिक अडचणी किंवा करिअरमधील ताण यांसारख्या बाबींची शक्यता तपासली जात आहे. एकाच वेळी नोकरी आणि अभिनय क्षेत्र या दोन्ही गोष्टी सांभाळताना तो नेहमीच मेहनत करत होता. त्याच्या अकाली जाण्याने मराठी कलाविश्वाने एक उमदा कलाकार गमावला आहे. सचिन चांदवडेच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी त्याच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











