केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

monsoon arrives in kerala : केरळमध्ये अखेर 4 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले असून हवामान खात्याने याची अधिकृत घोषणा केली आहे. आता पुढील काही दिवसांत मान्सून कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

monsoon arrives in kerala

monsoon arrives in kerala

मुंबई तक

05 Jun 2026 (अपडेटेड: 05 Jun 2026, 10:21 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

केरळमध्ये मान्सूनचे आगमन

point

महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

monsoon arrives in kerala : केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून हवामान खात्याने केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सुरुवातीला 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर 1 किंवा 2 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षा काहीसा उशीर झाल्यानंतर अखेर 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आता मान्सूनची पुढील वाटचाल कशी राहणार आणि महाराष्ट्रात तो कधी पोहोचणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Monsoon Update: 10 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार.. मान्सूनची दमदार हजेरी, थोड्याच वेळात कोसळधार!

केरळमध्ये मान्सूनचे आगमन

सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मदत मिळत आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची हालचाल आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. या दोन्ही घटकांमुळे मान्सूनच्या प्रगतीला गती मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, याच वातावरणीय परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसालाही पोषक वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा : Personal Finance: 'ही' कागदपत्रं नसतील तर चुकूनही घेऊ नका ती जमीन, नाहीतर…

महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये काही ठिकाणी मान्सूनपूर्व स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा पाऊस मान्सूनच्या अधिकृत आगमनामुळे नसून मान्सूनपूर्व वातावरणीय बदलांमुळे पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या मूळ अंदाजानुसार 10 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असून 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली येऊ शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार या अंदाजात काही बदल होतो का, याकडेही लक्ष लागले आहे.

हवामान खात्याचे माजी अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी 4 जूनच्या आयएमडी जीएफएस मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टी आणि दक्षिण कोकण भागात पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये पाऊस हजेरी लावेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाचे एस. डी. सानप यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोवा आणि कोकणातील काही भागांमध्ये दाखल होऊ शकतो, असे सांगितले आहे. त्यामुळे केरळनंतर आता कोकण आणि महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसत असून पुढील काही दिवसांतील हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.