श्रीकाकुलम : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील इच्छापुरम परिसरात अंधश्रद्धेच्या अतिरेकामुळे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 15 वर्षीय मुलीला तिच्या स्वतःच्या आईने जवळपास दोन वर्षे अंधाऱ्या खोलीत कैद करून ठेवले होते. मुलीची आई भाग्यलक्ष्मी हिच्या या कृतीमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ADVERTISEMENT
मुलीला मासिक पाळी आल्याने दोन वर्ष अंधाऱ्या खोलीत कोंडलं
मुलीला मासिक पाळी सुरू झाल्यानंतर भाग्यलक्ष्मीने तिला बाहेरील जगापासून पूर्णपणे दूर ठेवले. तिच्या पतीच्या निधनानंतर ती मानसिक धक्क्यात होती आणि त्यानंतर तिचा अंधश्रद्धेकडे कल वाढत गेला. तिने मुलगी बाहेर गेल्यास काही अपशकुन होईल किंवा तिच्यावर अनिष्ट संकट कोसळेल, अशी गैरसमजूत मनात बाळगली. या भीतीतूनच तिने मुलीला खोलीत बंद ठेवत त्या खोलीतील वीजपुरवठादेखील खंडित केला. मुलगी अनेक महिने प्रकाश न पाहता अंधारात राहत होती.
हेही वाचा : बॅरियर तोडून ट्रक झाला पलटी, पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा, दोघांचा दुर्दैवी अंत...
मुलगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत अवस्थेत आढळली
या काळात मुलगी शाळेत न जाताच बेपत्ता असल्याचे लक्षात येताच स्थानिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना शंका आली. त्यांनी मुलीसंदर्भातील माहिती आयसीडीएस (ICDS) विभागातील अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरु करत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीची सुटका केली. मुलगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत अवस्थेत आढळली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धेमुळे निरपराध मुलींना भोगावा लागणारा त्रास अधोरेखित झाला आहे. भाग्यलक्ष्मीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून मुलीला वैद्यकीय उपचार तसेच समुपदेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे. समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धेची पकड किती घातक आहे, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











