MPSC Drug Inspector Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याचे परिपत्रक आयोगाने जारी केल्यानंतर, या प्रक्रियेत सहभागी झालेल्या हजारो परीक्षार्थींमध्ये अत्यंत संताप आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी पुण्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व व्यथा मांडल्या.
ADVERTISEMENT
कोचिंग क्लासेस, आयोगातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची साखळी
पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांनी लोकसेवा आयोगास सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, या परीक्षेचा प्रश्नसंच लीक (Paper Leak) झाला होता. हा प्रश्नसंच एका विशिष्ट उमेदवारास मिळून त्याला त्याचा थेट लाभ झाल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. 22 मार्च रोजी झालेला हा पेपर प्रत्यक्ष परीक्षा होण्यापूर्वीच 20 मार्चला काही उमेदवारांना 'बाय हँड' देण्यात आल्याचा गंभीर आरोप मूळ तक्रारदारांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर विद्यार्थ्यांनी अत्यंत तीव्र शब्दात आपले प्रश्न व मागण्या मांडल्या आहेत. प्रश्नसंच फक्त एकाच उमेदवारापर्यंत मर्यादित राहणे अशक्य असून, यामध्ये कोचिंग क्लासेस, आयोगातील अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांचे मोबाईल फॉरेन्सिक, सीडीआर तपासून सीआयडी किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करून अहवाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडला पास करण्यासाठी बॉयफ्रेंडनं फोडला पेपर, नंतर दोघांचा ब्रेकअप
विद्यार्थ्यांना धमकी
तक्रारदारांनी जेव्हा सुरुवातीला पुरावे सादर केले होते, तेव्हा आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याऐवजी उलट तक्रारदार विद्यार्थ्यावरच मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. आता पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यामुळे आयोगाने नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांसह संबंधितांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि दोषींवर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करेपर्यंत केवळ पुनर्परीक्षेचे 'गाजर' दाखवून मूळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये, असेही विद्यार्थ्यांनी ठामपणे सांगितले. 12 जून रोजी आयोगाने 506 विद्यार्थ्यांची कटऑफ लिस्ट जाहीर केली होती, परंतु कोणाचेही गुण प्रसिद्ध केले नव्हते, यावरून प्रक्रियेतील अपारदर्शकता स्पष्ट होते.
हे ही वाचा : नंदुरबारमध्ये सुरू झालेली प्रेम कहाणी FDA च्या पेपर फुटीपर्यंत कशी गेली?
ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांच्या व्यथा
10 वर्षांनंतर आलेल्या या भरतीसाठी अनेकांनी आपल्या खाजगी नोकऱ्या सोडल्या होत्या, तर ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील मुले वर्षांनुवर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात राहून अभ्यास करत होती. सध्या महाराष्ट्रात औषध निरीक्षकांची तब्बल 800 पदे आवश्यक असताना केवळ 35 अधिकारी कार्यरत आहेत. एवढ्या महत्त्वाच्या आरोग्य विभागाशी संबंधित परीक्षेचा कागद फुटणे ही देशाच्या व राज्याच्या आरोग्य व्यवस्थेशी केलेली खेळखंडोबा आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असून परीक्षेत पूर्ण पारदर्शकता आणून दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय पुन्हा परीक्षा घेऊ नये आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखाने मागणी केली आहे.
ADVERTISEMENT












