72 तास कुणालच्या कुत्र्यानं घरी काय केलं? आजोबा पोहोचताच धावत आला आणि...

मुंबई तक

25 Aug 2026 (अपडेटेड: 25 Aug 2026, 11:19 AM)

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : तीन दिवस घरात एकटाच राहिलेला शेरू आजोबांना पाहताच धावत आला आणि त्यांना बिलगला. मालकाच्या मृत्यूनंतर शेरूला सुरक्षितपणे रेस्क्यू करून महापालिकेच्या शेल्टर होममध्ये नेण्यात आलं.

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

72 तास कुणालच्या कुत्र्यानं घरी काय केलं?

point

आजोबा पोहोचताच धावत आला आणि...

Chhatrapati Sambhajinagar Suicide Case : छत्रपती संभाजीनगरमधील तीसगावात घडलेल्या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, दुसरीकडे घरात एकटाच राहिलेला पाळीव कुत्रा शेरू तब्बल तीन दिवस आपल्या माणसांची वाट पाहत होता. घरात कोणीच नसल्याने शेरूची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून घरातच कसंबसं त्याला अन्न आणि पाणी दिलं जात होतं. मात्र, त्याचा मालक परत येईल, या आशेने शेरू सतत घराच्या दाराकडे पाहत होता. बाहेर कोणाच्या येण्याची चाहूल लागली की तो लगेच दाराकडे धावत जायचा.

हे वाचलं का?

हेही वाचा : घरगुती वाद की आणखी काही? तिघांच्या मृत्यूचं कारण काय? दोन्ही कुटुंबियांचे वेगवेगळे दावे

आजोबांना पाहताच शेरू त्यांच्याकडे धावत गेला

अखेर शेरूला घेण्यासाठी त्याचे आजोबा घरी पोहोचले. आजोबांना पाहताच शेरू त्यांच्याकडे धावत गेला आणि त्यांना बिलगला. आजोबांनीही शेरूला जवळ घेतलं, त्याला प्रेमाने खाऊ घातला आणि पाणी दिलं. तीन दिवस एकटेपणात राहिल्यानंतर शेरू आणि आजोबांची झालेली ही भेट पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. शेरूची अवस्था पाहून आजोबांनाही त्याच्यासाठी जीव तळमळत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते गेल्या तीन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ घरी येऊन त्याला काही ना काही खाऊ घालण्याचा आणि पाणी देण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग संथ, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज

शेरूला महापालिकेच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात येणार

दरम्यान, पेट अॅनिमल लवर्स असोसिएशनची टीमही घटनास्थळी पोहोचली. आजोबांच्या मदतीने शेरूला घरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. शेरूला व्हॅनमधून नेत असताना आजोबांच्या डोळ्यातही अश्रू होते. पेट अॅनिमल लवर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, शेरूला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं असून यासंदर्भात महापालिका आयुक्तांशीही चर्चा करण्यात आली आहे. सध्या शेरूला महापालिकेच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात येणार असून तिथे त्याची काळजी घेतली जाणार आहे.

मात्र, शेरूला कायमस्वरूपी शेल्टर होममध्ये ठेवणं शक्य नसल्याने एखाद्या संवेदनशील कुटुंबाने पुढे येऊन त्याला दत्तक घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. शेरूला आता फक्त एका नव्या घराची नाही, तर माणसांच्या मायेची गरज आहे. महापालिकेकडून शेरूसाठी शक्य तितक्या लवकर घर मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्या पूर्वीच्या कुटुंबाप्रमाणेच त्याची काळजी घेणारं संवेदनशील कुटुंब शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.