मुंबईची खबर : 'कानाखाली देऊ का?' महापौर रितू तावडे कुणावर संतापल्या?

मुंबई तक

04 Jul 2026 (अपडेटेड: 04 Jul 2026, 05:16 PM)

मुंबईच्या महापौर रितू तावडे स्वत: रस्त्यावर उतरुन सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पाहणी करत आहेत. दरम्यान, त्यांनी काल (3 जुलै) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तो व्हिडिओ नेमका काय आहे, जाणून घेऊया.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'कानाखाली देऊ का?'

point

महापौर रितू तावडे संतापल्या

point

नेमकं कारण काय?

Mumbai News : मुंबईतील साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावरुन बीएमसीच्या ढिसाळ कारभारावर चहुकडून टीका होत आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या महापौर रितू तावडे स्वत: रस्त्यावर उतरुन सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पाहणी करत आहेत. आज (4 जुलै) त्यांनी बीएमसीच्या मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट दिली. मुंबईतील वेगवेगळ्या विभागांमधील सद्यस्थितीचा, सखल भागांमधील पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपांचा आणि वाहतूक व्यवस्थेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. दरम्यान, त्यांनी काल (3 जुलै) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तो व्हिडिओ नेमका काय आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

दोन कानाखाली देऊ का?

महापौर रितू तावडे यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीन जुलै रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील कॉटन ग्रीन परिसरातील असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. या व्हिडिओत एक मॅनहोल उघडं असल्याचं दिसून येत आहे. तसेच काही कामगार तिथं काम करत आहेत. या व्हिडिओत महापौर आधी हिंदीतून आणि नंतर मराठीतून बोलत असून त्या एका व्यक्तीवर संतापल्याचं दिसतं. तावडे संतापून त्याला म्हणतात की, 'क्या खिंचू कान के नीचे दो? इधर से लोग जा रहे है भाग-भाग के, मोबाइल पे है. वापिस कोई गिरा तो?' (दोन कानाखाली देऊ का? इथून लोक धावत-पळत जात आहेत. पुन्हा कोण पडलं तर?') ती व्यक्ती नेमकी कोण आहे? तो मजूर आहे का? हे त्या व्हिडिओतून नीट कळून येत नाही.

हे ही वाचा : Mumbai Monsoon : मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटिंग, चार दिवसांत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

'बॅरिकेड्स आण, लगेच'

यापुढं त्या मराठीतून बोलतात. त्या म्हणतात की, 'काल माणूस एक मेला. बॅरिकेड्स आण, लगेच.' यानंतर त्या कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत. फोनवर त्या म्हणत आहेत की, '...दोन वर्कर्स काम करत आहेत. ना इथे बॅरिकेड्स आहेत, ना कायेय? तुम्ही बघताय ना काय परिस्थिती आहे?...प्लीज, असं करु नका हो साहेब.' असा आशय असणारा हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. या सगळ्या व्हिडिओत बॅकग्राऊंडला 'रक्तचरित' हे गाणं वाजत राहतं.

हे ही वाचा : मुंबईत मुसळधार पाऊस, पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट जारी

मुंबईकरांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता!

एका बाजूला कानाखाली मारण्याची भाषा आणि दुसरीकडे फोनवर बोलताना साहेब असं म्हणून त्यांनी वापरलेली मवाळ भाषा यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये रितू तावडेंनी लिहिलं आहे की, 'मुसळधार पावसात MbPT च्या हद्दीत विना-बॅरिकेड्स उघड्या मॅनहोलचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पंप आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे. स्थानिक प्रशासन आणि MbPT मध्ये चांगल्या ताळमेळासाठी मी लवकरच एक समन्वय बैठक आयोजित करत आहे. मुंबईकरांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता!'