नागपूर : कोराडी तालुक्यातील महादूला गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घोणस नावाचा साप पकडण्याचे धाडस एका व्यक्तीच्या जीवावर बेतले. सुरेश मुकुंदराव ढोके (वय 55) हे आपल्या घराजवळ दिसलेल्या सापाला स्वतः पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्या सापाने त्यांना चावा घेतल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली असून स्थानिकांमध्ये या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
सर्पमित्र येण्याआधी सापाला डिवचलं अन् जीव गेला
मिळालेल्या माहितीनुसार, ढोके यांच्या घराजवळ अचानक साप दिसला. त्यांनी त्वरित सर्पमित्राला संपर्क साधला, पण तो येईपर्यंत त्यांनी स्वतःच साप पकडण्याचे ठरवले. त्यांनी सापाला एका पोत्यात भरले आणि काही काळ त्याला डिवचण्याचा प्रयत्नही केला. त्या दरम्यान सापाने त्यांना चावा घेतला. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचल्यावर ढोके यांच्या हातावर चाव्याच्या खुणा स्पष्ट दिसत नसल्या तरी त्यांनी परिस्थिती पाहून त्वरित रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
रुग्णालयात उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू
घोणस हा साप अतिविषारी साप म्हणून ओळखला जातोय. सुरेश मुकुंदराव ढोके यांना चावलेल्या साप घोणस असल्याचे लक्षात येताच सर्पमित्रांनी ढोके यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, विष शरीरात वेगाने पसरल्याने डॉक्टरांच्या उपचारांनंतरही ढोके यांचे 7 नोव्हेंबर रोजी निधन झाले. सुरेश ढोके यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची विधी कोलार नदीकाठच्या स्मशानभूमीत शनिवारी पार पडली. या घटनेनंतर स्थानिक सर्पमित्रांनी सर्वांना आवाहन केले आहे की साप दिसल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता तज्ञांची मदत घ्यावी. अति धाडस केल्यास अशा प्रकारचे जीवघेणे प्रसंग उद्भवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











