पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुण्यातील त्यांच्या प्रसिद्ध ‘नानाची वाडी’ येथे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, चाहते तसेच सिनेसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर पोहोचले आहेत. याच ठिकाणी नाना पाटेकरांना मुखाग्नी देण्यात आला.
ADVERTISEMENT
‘नानाची वाडी’वर अंतिम दर्शनासाठी गर्दी
नाना पाटेकर यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चाहत्यांची आणि जवळच्या व्यक्तींची गर्दी होऊ लागली. नाना पाटेकर यांचे या फार्म हाऊसशी विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वीचे अंतिम क्षण याच ठिकाणी पार पडले.
सिनेसृष्टीतील जवळचे मित्र पोहोचले
नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अनेक सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी ‘नानाची वाडी’ गाठली. नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या ‘क्रांतिवीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच‘नटसम्राट’शी संबंधित लेखिका किरण यांनीही नाना पाटेकर यांचे अंतिम दर्शन घेतले.
हे ही वाचा>> नाना पाटेकरांची शेवटची 2 तास 50 मिनिटं... मृत्यूपूर्वी काय घडलं?
अभिनेते आणि नाना पाटेकर यांचे जवळचे मित्र प्रवीण तरडे हे देखील आपल्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी तेथे पोहोचले.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर सामाजिक प्रश्नांवरही ते सातत्याने भूमिका मांडत असत. त्यांच्या समाजसेवेच्या कार्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे संबंध होते.
नाना पाटेकर यांच्या अंतिम दर्शनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि नेत्या रूपाली चाकणकर पोहोचल्याची माहिती आहे. त्यांनी नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
हे ही वाचा>> स्टार झाला, पुरस्कार जिंकले; पण नाना पाटेकरांनी कमावलं ते काही वेगळंच…
याशिवाय केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगररचना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही ‘नानाची वाडी’ येथे पोहोचून श्रद्धांजली अर्पण केली.
तुकाराम मुंढेही अंतिम दर्शनासाठी उपस्थित
प्रशासकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे हे देखील नाना पाटेकर यांच्या अंतिम दर्शनासाठी ‘नानाची वाडी’ येथे उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार भीमराव तापकीर यांनीही नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली.
महेश मांजरेकर लंडनमध्ये, पत्नी मेधा उपस्थित
नाना पाटेकर यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या कामानिमित्त लंडनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला वैयक्तिकरित्या उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती आहे.
मात्र, त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर ‘नानाची वाडी’ येथे उपस्थित राहिल्या आणि त्यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखाच्या प्रसंगी त्यांनी नाना यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
नानांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांचीही गर्दी
नाना पाटेकर यांनी चार दशकांहून अधिक काळ हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आता पुण्यातील ‘नानाची वाडी’ येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT












