Nanded Crime News : प्रेमसंबंधातून कर्नाटकात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमधील मुखेड तालुक्यातल्या गोणेगाव येथील 21 वर्षीय विष्णूकांत पांचाळ या तरुणाला प्रेमसंबंध असलेल्या विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना उघडकीस आलीये. या घटनेने नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
नांदेडमधील तरुणाचे कर्नाटकातील महिलेसोबत होते प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, गोणेगावचा रहिवासी विष्णूकांत पांचाळ याचे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील नागमप्पली येथील विवाहित महिलेबरोबर गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याबद्दल त्या महिलेच्या नातेवाईकांना राग होता. त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी महिलेचे नातेवाईक गजानन आणि अशोक यांनी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावले. प्रेमाच्या नावाखाली बोलावून घेतलेल्या या भेटीचे रूपांतर काही क्षणांतच भयानक हत्याकांडात झाले.
सदर दोघांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी विष्णूकांतचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याचा अमानुष छळ केला. त्याच्या शरीरावर गरम वस्तूने चटके दिले, मारहाण केली आणि निर्दयपणे त्याला रक्तबंबाळ केले. या अत्याचारामुळे विष्णूकांत गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला तात्काळ हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. तर विष्णूकांतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेमसंबंधामुळे निर्दयीपणे जीव गमवावा लागल्याने गावात संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी नागमप्पली येथे पोहोचून पंचनामा केला आणि गुन्ह्याची नोंद घेतली आहे. गजानन, अशोक आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. विष्णूकांतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
सोशल मीडियावर या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, तरुणाच्या हत्येस जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. कर्नाटक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, घटनेमागील नेमकं कारण आणि इतर आरोपींचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रेमाच्या नावाखाली सुरु झालेलं नातं शेवटी एका निर्दोष तरुणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर गोणेगावातील नागरिकांनी विष्णूकांतला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











