नवी मुंबईत अग्नी तांडव, सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत माय-लेकींचा मृत्यू; सर्वत्र धुराचे लोट

Navi Mumbai Fire news : नवी मुंबईत अग्नी तांडव, सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत माय-लेकींचा मृत्यू; सर्वत्र धुराचे लोट

Mumbai Tak

मुंबई तक

21 Oct 2025 (अपडेटेड: 21 Oct 2025, 11:17 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईत अग्नी तांडव, सर्वत्र धुराचे लोट

point

सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत माय-लेकींचा मृत्यू

नवी मुंबई : कामोठे परिसरातील सेक्टर 36 येथील अंबे श्रद्धा को-ऑपरेटिव्ह सोसायटीत रविवारी सकाळी भीषण आग लागलीये. या आगीत एका आई आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला असून घरातील उर्वरित तीन सदस्यांनी जीव वाचवण्यात यश मिळवले आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

हे वाचलं का?

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अचानक दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. तात्काळ इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कामोठे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली.

हेही वाचा : Personal Finance: न वाचता Loan Agreement वर अजिबात करू नका सही, नाहीतर होईल नुकसान...

दुर्दैवाने, घराच्या आत अडकलेल्या दोन महिलांचा, म्हणजेच आई आणि मुलीचा, आगीत होरपळून मृत्यू झाला. तर घरातील वडील आणि दोन मुलं यांनी वेळीच बाहेर पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, वाशीतील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीतही अशाच प्रकारे आग लागून चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या आगीत 10वी, 11वी आणि 12वी मजल्यावरील घरे जळाली. त्यात एका वृद्ध आजीबाईंसह आई, वडील आणि सहा वर्षांची मुलगी यांचा दुर्दैवी अंत झाला होता.

सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक सोसायट्यांमध्ये अग्निसुरक्षेची योग्य साधने उपलब्ध नसल्याने अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाने तातडीने सुरक्षा तपासणी मोहिम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

    follow whatsapp