Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा गावात एका हत्तीने घातलेल्या थैमानामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “ओंकार” नावाने ओळखला जाणारा हा हत्ती सध्या संपूर्ण परिसरात धुमाकूळ घालत असून, त्याने घराशेजारी उभ्या असलेल्या मोटारसायकलवर पाय ठेवून ती अक्षरशः चिरडून टाकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
घटनेचा हा व्हिडिओ गावकऱ्यांनी दूरून टिपला असून, त्यात ओंकार काही क्षणांतच संतापून घराजवळ उभ्या असलेल्या दुचाकीवर पाय ठेवत तिला मोडून काढताना स्पष्ट दिसत आहे. मोटारसायकल चिरडत असताना परिसरात उपस्थित असलेले गावकरी ओरडून त्याला आवर घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. “ओंकार नको रे, नको रे मोटारसायकल चिरडू नको,” अशा विनवण्या करत गावकरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाचे आवाजही व्हिडिओत ऐकू येतात.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून हा हत्ती परिसरात वारंवार दिसत आहे. सुरुवातीला तो जंगलाच्या काठावर फिरताना दिसत होता, मात्र आता तो गावाच्या आतपर्यंत येऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकांनी रात्री बाहेर न पडण्याचा सल्ला एकमेकांना देण्यास सुरुवात केली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ओंकार” हा हत्ती काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग आणि गोवा सीमाभागात फिरत आहे. या हत्तीने यापूर्वीही काही ठिकाणी झाडे पाडली आणि शेतातील पिकांचे नुकसान केले होते. मात्र आता तो मानववस्तीच्या अगदी जवळ आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तत्काळ त्या भागात पथक पाठवले असून हत्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हत्तीच्या जवळ न जाण्याचे आणि त्याला चिडवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या हालचाली सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. “रात्री तो कधी गावात येईल सांगता येत नाही, त्यामुळे आम्ही सतत सावध राहतो,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
या संपूर्ण घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्तीतील संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने हत्तींचे गावाकडे वळणे वाढले आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, “ओंकार” हत्तीचा मोटारसायकल चिरडतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, हजारो लोकांनी तो शेअर केला आहे. काहींनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी बहुतांश लोकांनी गावकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, अधिकारी “ओंकार”ला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवण्याचे प्रयत्न करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
