बीडचा राजू शेख इन्स्टाग्रामवर बनला 'अजय म्हस्के', पालघरच्या महिलेला फसवून नको ते केलं

Palghar Crime News : बीडच्या एका तरुणाने बनावट नाव वापरून पालघरमधील महिलेची फसवणूक केली असून, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण आणि आर्थिक लूट केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Palghar Crime News

Palghar Crime News

मुंबई तक

13 Apr 2026 (अपडेटेड: 13 Apr 2026, 05:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडचा राजू शेख इन्स्टाग्रामवर बनला 'अजय म्हस्के'

point

पालघरच्या महिलेला फसवून नको ते केलं

Palghar Crime News : मो.हुसेन खान - सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून पालघरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख नावाच्या एका आरोपीने स्वतःची खरी ओळख लपवून एका 29 वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. या आरोपीने इंस्टाग्रामवर 'अजय म्हस्के' या बनावट हिंदू नावाने खाते उघडून पीडितेशी ओळख वाढवली होती. त्याने केवळ नावच बदलले नाही, तर पीडितेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे मोठे आमिष दाखवले. हा बनाव इतका पद्धतशीर होता की पीडितेने या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला, ज्याचा शेवट पुढे मोठ्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणुकीत झाला. या घटनेमुळे परिसरात लव जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हे वाचलं का?

बनावट ओळख आणि लग्नाचे आमिष

पीडित महिला पालघरमध्ये वास्तव्यास असून तिची ओळख 2025 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपीशी झाली होती. अजय म्हस्के या नावाने मैत्री केल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल क्रमांक दिला आणि दोघांमध्ये वारंवार संवाद सुरू झाला. यानंतर 23 डिसेंबर 2025 रोजी आरोपीने केळवा येथे पीडितेची भेट घेतली आणि लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधली. केळवा देवीपाडा येथील एका हॉटेलमध्ये त्याने पीडितेवर शारीरिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, याच ठिकाणी पीडितेने त्याचे ओळखपत्र (आधारकार्ड) पाहिले असता त्याचे खरे नाव राजू सिकंदर शेख असल्याचे आणि तो बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. आपली ओळख उघड होऊनही त्याने जून 2026 मध्ये लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन पुन्हा 22 फेब्रुवारी 2026 आणि 15 मार्च 2026 रोजी पीडितेचे शारीरिक शोषण केले.

आर्थिक लूट आणि ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार

केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर या नराधमाने पीडितेची मोठी आर्थिक फसवणूक देखील केली आहे. गेल्या 6 महिन्यांच्या काळात त्याने पीडितेकडून सुमारे 2.5 लाख रुपये विविध कारणांसाठी उकळले. शिवाय आरोपी आधीच विवाहित असून त्याला 2 मुले आहेत, मात्र ही सर्व माहिती त्याने पीडितेपासून लपवून ठेवली होती. या प्रकरणातील अधिक संतापजनक बाब म्हणजे, जेव्हा पीडितेला या सर्व फसवणुकीची जाणीव झाली, तेव्हा आरोपीच्या पत्नीने पीडितेचे काही खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे फोटो व्हायरल न करण्यासाठी पीडितेकडे आणखी 2 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली, ज्यामुळे पीडिता प्रचंड मानसिक दबावाखाली आली होती.

पोलीस कारवाई आणि आरोपीला कोठडी

अखेर या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेने 08 एप्रिल 2026 रोजी केळवे सागरी पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून आरोपी राजू शेख याला पुणे येथून अटक केली. न्यायालयाने या आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्यावर फसवणूक, ब्लॅकमेल, खंडणी आणि बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावरील मैत्रीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पीडितेने इतर महिलांना अशा प्रकारे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी अंत