पंढरपूर : शेवाळावरुन पाय घसरुन 5 वर्षीय चिमुकला शेततळ्यात पडला, वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही मृत्यू

Pandharpur News : परंतु परिस्थिती अनुकूल नसल्याने आणि तिघेही एकमेकांना धरून असल्याने ते पाण्यावर तरंगू शकले नाहीत. काही क्षणांत तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Pandharpur News

Pandharpur News

मुंबई तक

10 Dec 2025 (अपडेटेड: 10 Dec 2025, 12:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंढरपूर : शेवाळावरुन पाय घसरुन 5 वर्षीय चिमुकला शेततळ्यात पडला

point

वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही मृत्यू

Pandharpur News : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी परिसरात सोमवारी दुपारी हृदयद्रावक घटना उघडकीस आली. शेतात राहून मजुरी करणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. विजय राजकुमार लोंढे (30), पत्नी प्रियांका (28) आणि त्यांचा लहान मुलगा प्रज्वल (5) अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबातील मोठा मुलगा शाळेत असल्यामुळे तो या दुर्घटनेत बचावला.

हे वाचलं का?

शेवाळ साचल्यामुळे तो घसरून पाण्यात पडला

कोर्टी येथे सुरेश लाड आणि निखिल लाड यांच्या मालकीच्या शेतात लोंढे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सालगडी म्हणून राहत होते. रोजच्या प्रमाणे सोमवारीही दोघे शेतातील कामात गुंतले होते. तेव्हाच खेळत असलेला प्रज्वल शेततळ्याच्या दिशेने गेला. कडेला शेवाळ साचल्यामुळे तो घसरून पाण्यात पडला. हे पाहताच प्रियांका मुलाला वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उतरली. मात्र तळ्यातील घसरडी पृष्ठभाग, कडेला असलेली साचलेली गळ आणि खोल पाणी यामुळे ती स्वतःच अडचणीत सापडू लागली.

हेही वाचा : EVM मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममधून संशयास्पद आवाज, धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं?

पत्नी आणि मुलगा दोघेही पाण्यात झुंजत असल्याचे पाहताच विजय लोंढे यांनीही तळ्यात उडी घेतली. परंतु परिस्थिती अनुकूल नसल्याने आणि तिघेही एकमेकांना धरून असल्याने ते पाण्यावर तरंगू शकले नाहीत. काही क्षणांत तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी शेत परिसर ओसाड असल्याने कोणीही तातडीने मदतीला धावून येऊ शकले नाही.

नंतर काही शेतकऱ्यांना पाण्यात हालचाल दिसत नसल्याची शंका आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली. दरम्यान, तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. प्राथमिक तपासानुसार ही दुर्घटना अपघाती स्वरूपाची असल्याचे समजते.

लोंढे कुटुंब मुळचे मंगळवेढा तालुक्यातील असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते पंढरपूर तालुक्यातील या शेतात राहून काम करत होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात दुःखाचं वातावरण आहे. शालेय वयातील मोठा मुलगा एकटाच उरल्यानं जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे कुटुंबाला योग्य मदत देण्याची मागणी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

EVM मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममधून संशयास्पद आवाज, धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं?

    follow whatsapp