patient dies inside ambulance as door gets jammed : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा आणि बेफिकिरीचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. उपचारांसाठी आणलेला एक गंभीर रुग्ण 108 रुग्णवाहिकेत अडकून राहिला. जिल्हा रुग्णालयाच्या दारापर्यंत पोहोचूनही वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सतना जिल्हा रुग्णालयाच्या (सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय) प्रवेशद्वारावर घडली असून, त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
रामनगर येथील 67 वर्षीय राम प्रसाद हे सकाळी घराबाहेर शेकोटी तापत असताना अचानक बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रामनगर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे सतना जिल्हा रुग्णालयात पाठवले होते.
गंभीर अवस्थेतील पेशंटला रुग्णवाहिका घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली खरी, मात्र त्यानंतर घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक ठरला. रुग्णवाहिकेचे मागील दार अचानक जाम झाले आणि ते उघडताच येईना. रुग्ण आतमध्ये अडकलेला असताना बाहेर नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिकांनी दार उघडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हेही वाचा : बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा सवाल, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण VIDEO
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार, काही लोकांनी लाथा मारून, हातोडे व इतर औजारांच्या मदतीने रुग्णवाहिकेचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेचा चालक खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न करतानाही दिसून येतो. या संपूर्ण वेळेत रुग्ण जीव-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होता. मात्र दार उघडण्यात झालेल्या विलंबामुळे मौल्यवान वेळ वाया गेला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर रुग्णवाहिकेचे दार उघडण्यात यश आले. राम प्रसाद यांना स्ट्रेचरवर बाहेर काढून तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या प्रकरणावर आरोग्य विभागाने नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला होता. मात्र, व्हायरल व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार रुग्णवाहिकेचे दार वेळेत उघडले असते, तर कदाचित रुग्णाचे प्राण वाचले असते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रकरण गंभीर बनल्यानंतर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मनोज शुक्ला यांनी जिल्हा समन्वयक अधिकाऱ्याला नोटीस बजावली असून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे सतना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, ‘आपत्कालीन सेवा’ म्हणवली जाणारी 108 सेवा खरोखरच किती सक्षम आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











