Satara drugs racket ,सातारा : गुजरातमधून आलेल्या नार्कोड्रग्ज पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या एका गावात केलेल्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. या कारवाईत सुमारे 55 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा सापडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.. आयपीएस रँकचे तीन अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. हे सर्व अधिकारी आणि त्यांची टीम ही गुजरातमधून आल्याची माहिती आहे. त्यांनी स्थानिक आणि बिहारच्या काही युवकांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करताना पुसटशी कल्पनाही या सातारा पोलिसांना होऊन दिली नाही. इतकी गोपनीयता या पथकाने पाळली.
ADVERTISEMENT
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या शेडवर गुजरात येथून आलेल्या डी आर आय विभागाच्या पथकाने या शेडचा मालक हा बाबा मोरे याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली. या शेडमध्ये सुमारे 55 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज बनवण्याचे सर्व साहित्य जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. तयार आणि कच्चामाल असा मिळून हा सगळा मुद्देमाल यांनी ताब्यात घेतला असून या संपूर्ण परिसराला या पथकाने सील ठोकले आहे. या ठिकाणी काही बिहार मधील युवकही काम करत असल्याचं समोर आले आहे.
ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी बाबा मोरे याच्यावर गंभीर गुन्हे
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाबा मोरे हा एका मोठ्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. महाराष्ट्र केसरी पटकावणारा संजय पाटील यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातला हा बाबा मोरे प्रमुख आरोपी समजला जातो. इतकच नाही तर त्याच्यावर असंख्य खटले गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने या अगोदरही कारवाई झालेल्या ठिकाणाच्या परिसरामध्ये मॅकडॉल नंबर वन ही डुबलीकेट दारू बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. तो उघडकीस आणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेला त्याच्याकडून बाटल्या संबंधित कंपनीचे नाव असलेली टोपणं आणि दारू बनवण्याचे सर्व साहित्य पोलिसांनी हस्तगत केले होते. या एमडी ड्रगच्या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खळबळ उडाली आहे. याबाबत सातारा पोलिसांना कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.
सुमारे एक महिन्यापूर्वी साताऱ्यातील बामणोली परिसरातही अशाच प्रकारे दुर्गम भागात धाड टाकण्यात आली होती. बामणोलीतील ड्रग्ज बनवण्याचा कारखाना मुंबई येथून आलेल्या नार्को टेस्ट पथकाने धाड टाकून कोट्यावधी रुपयाचा एमडी ड्रग्जचा मल हस्तगत केला होता. त्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नसताना साताऱ्यात जिल्ह्यातली ही दुसरी कारवाई म्हणजे सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेणारी ठरू शकते. या कारवाईबाबत अधिकृत अद्याप पर्यंत कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. याबाबत पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











