Sangli News, स्वाती चिखलीकर : सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेचे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर (वय 31) यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जत शहरात आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराकडे सुरुवातीला 75 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर 50 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. या प्रकरणी 10 जून 2026 रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तातडीने हालचाली करत सापळा रचला होता.
ADVERTISEMENT
बिल मंजूर, तरीही मागितली लाच
या घटनेतील तक्रारदार यांचा फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे. सन 2025 मध्ये पार पडलेल्या जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांनी प्रशासकीय कामासाठी फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर झाले होते, मात्र बिलाची रक्कम संबंधित व्यक्तीला अदा करण्यासाठी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेत मदत करण्याच्या बदल्यात अधिकारी प्रवीण बाबर यांनी लाचेची मागणी केली होती. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यानेच अडवणूक केल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
सापळा रचून पकडले
तक्रार प्राप्त होताच सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेत पडताळणी केली. पडताळणीदरम्यान 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने जत नगरपरिषद परिसरातील एका फोटो स्टुडिओमध्ये सापळा लावला. ठरल्याप्रमाणे जेव्हा आरोपी अधिकारी बाबर याने तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
हे ही वाचा : Personal Finance: 'हे' कागद नसतील तर अजिबात खरेदी करू नका तशी शेतजमीन!
20 हजारांच्या डमी नोटा
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. एसीबीने जप्त केलेल्या 50 हजार रुपयांच्या रकमेमध्ये 30 हजार रुपयांच्या खऱ्या चलनी नोटा आणि 20 हजार रुपयांच्या डमी नोटांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











