Satara Crime: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अनैतिक संबंधातून भयानक हत्याकांड घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी पीडित तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
सतीश उर्फ आप्पा दादासाहेब गडस (27 वर्षे) अशी मृताची ओळख समोर आली असून फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील रहिवासी होता. सतीश 14 जानेवारी रोजी अचानक घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी सर्व संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर 21 जानेवारी 2026 रोजी सतीषचा भाऊ सागर गडस याने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सतीश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बेपत्ता सतीशचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि बऱ्याच धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध...
मिळालेल्या माहितीनुसार, सतीशचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तीच महिला या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिला विवाहित असून तिचे आणखी दुसऱ्या तरुणासोबत संबंध होते. तरीसुद्धा, तिने सतीशसोबतचे प्रेमसंबंध सुरूच ठेवले. कालांतराने, सतीशने महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केल आणि त्यामुळे ती सतीशच्या या वागण्याला वैतागली. या दबावातून हत्येचा कट रचण्यात आला. संबंधित महिलेने तिचा पती लखन बुधावले व पहिला प्रियकर सतीश तुकाराम माने (रा. विडणी, फलटण) यांच्यासह पीडित सतीशला संपवण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा: गडचिरोली: प्रेमविवाह ते निर्दयी हत्या; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं, एका महिन्यानंतर मृत्यू! दोन मुलं अनाथ...
घटनेच्या दिवशी काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी पीडित सतीश, ती महिला, तिचा पती आणि तिचा आधीचा प्रियकर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादात लखन बुधावले आणि सतीश माने यांनी सतीशवर लोखंडी रॉडने हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर, आरोपींनी त्याच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने त्याला कारमध्ये बसवलं आणि विडणीच्या मांगोळा माळ परिसरात त्याला घेऊन गेले. त्या ठिकाणी योजनेप्रमाणे, सतीशच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर देखील आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर रात्रीच्या अंधारात तिघांनी लाकूड तोडण्याच्या यंत्राचा वापर करून सतीशच्या शरीराचे तुकडे केले आणि नंतर हे तुकडे दोन पोत्यांमध्ये भरले. एक पोतं साठे गावाच्या हद्दीत असलेल्या एका तलावात फेकण्यात आलं, तर दुसरं पोतं नीरा नदीच्या पात्रात आरोपींनी फेकलं.
हे ही वाचा: बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, ड्रायव्हरला अटक, तपासात गंभीर बाब समोर
तिन्ही आरोपी पोलिसांच्या अटकेत
तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर, पोलिसांनी महिलेचा पती आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरू केली. सुरूवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, कठोर चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. ही भयानक घटना उघडकीस आल्यानंतर फलटण आणि आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले जात असून या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT











