'हसू झालंय माझं..,जीव होता तो माझा..', सोलापुरातल्या पायलची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट; तिघांना अटक

Solapur Crime News : माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथील पायल रणदिवे हिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. तिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते आणि त्यासाठी तिने रीतसर क्लासही लावला होता. मात्र, तिच्या या छोट्याशा स्वप्नाचा सासरच्या मंडळींनी गळा घोटल्याचा आरोप होत आहे. शनिवारी सायंकाळी पायलने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Solapur Crime News

Solapur Crime News

मुंबई तक

22 Feb 2026 (अपडेटेड: 22 Feb 2026, 01:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'हसू झालंय माझं..,जीव होता तो माझा..',

point

सोलापुरातल्या पायलची काळजाचं पाणी करणारी सुसाईड नोट; तिघांना अटक

Solapur Crime News, सोलापूर : "माझं हसू झालंय... माझं पार्लर बंद केलं... जीव होता तो माझा... स्वप्न होतं गं..." एका 22 वर्षांच्या तरुण विवाहितेचे हे शेवटचे शब्द आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला चटका लावून जात आहेत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पायल रणदिवे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.

हे वाचलं का?

स्वप्नांचा चक्काचूर आणि सासरचा छळ

माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथील पायल रणदिवे हिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती. तिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते आणि त्यासाठी तिने रीतसर क्लासही लावला होता. मात्र, तिच्या या छोट्याशा स्वप्नाचा सासरच्या मंडळींनी गळा घोटल्याचा आरोप होत आहे. शनिवारी सायंकाळी पायलने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

 हातावर कोरल्या वेदना

पायलने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी न लिहिता आपल्या हातावरच आपल्या वेदना लिहून ठेवल्या होत्या. तिने हातावर लिहिलेला मजकूर वाचून उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. तिने लिहिले होते:  "हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केलं.. जीव होता तो माझा.. स्वप्न होतं ग.. आजवर शांत बसले पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघूनही गेले नाही.. माझ्यामुळे त्रास झाला असेल तर sorry."

अंगावर मारहाणीच्या खुणा

पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे ही आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेला छळ असल्याचा संताप माहेरच्या मंडळींनी व्यक्त केला आहे. "पायलला सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. तिचे स्वप्न हिरावून घेतले गेले आणि तिला मरण्यास प्रवृत्त केले," असा आरोप पायलच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत केला आहे.

तीन आरोपींना अटक, एक फरार

या हृदयद्रावक घटनेनंतर नातेपुते पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आहेत. पोलिसांनी पायलचा पती, सासू आणि सासरा यांना अटक केली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी (दीर) सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

परिसरात हळहळ

एकीकडे आपण 'लेक वाचवा, लेक शिकवा'च्या घोषणा देतो, मात्र दुसरीकडे एका शिकलेल्या आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणीला हुंडा किंवा कौटुंबिक वादातून आपला जीव गमवावा लागतो, याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. पायलच्या मामांनी, गणेश कदम यांनी आपल्या भाचीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली असून, दोषींना कठोर शासन व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अकोला : आधी दोघींनी रील शूट केली, नंतर जिवलग मैत्रिणीच्याच घरात घुसून लाखोंचे दागिने अन् पैसे लंपास...
 

    follow whatsapp