बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ, 4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले

मुंबई तक

14 May 2026 (अपडेटेड: 14 May 2026, 01:17 PM)

Stray dog attack : बीड शहरातील पंढरी नगरी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असून, नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Stray dog attack

Stray dog attack

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ

point

4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले

Stray dog attack ,रोहिदास हातागळे : बीड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता एका निष्पाप 4 वर्षीय बालकाला या दहशतीचा सामना करावा लागला आहे. शहरात कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले असून, वारंवार अशा घटना घडूनही नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या नगरपालिकेविरुद्ध आता सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : शरीराच्या तुकड्यांनी भरलेली गोणी अन् सुटकेस, मुंडकी गायब; 'ते' सहा मृतदेह कुणाचे?

 खेळताना अचानक झाला हल्ला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला पुढील अनर्थ

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील पंढरी नगरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. 4 वर्षांचा एक चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या एका टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी या बालकावर झडप घालून त्याला जखमी केले. सुदैवाने, जवळच असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहताच तात्काळ धाव घेतली आणि कुत्र्यांना पिटाळून लावले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात बालक जखमी झाले असून, त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पंढरी नगरी परिसरातील रहिवासी हादरून गेले असून, लहान मुलांना घराबाहेर सोडणेही आता कठीण झाले आहे.

हेही वाचा : ड्रायव्हर अन् कंडक्टरने महिलेला ओढलं अन्.., स्लीपर बसमध्ये नेमकं काय घडलं?

शहराच्या विविध भागांत कुत्र्यांची दहशत; प्रशासनाचे ठोस उपाययोजनांकडे दुर्लक्ष

बीड शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या केवळ एका परिसरापुरती मर्यादित नसून, गेल्या काही महिन्यांपासून पेठ बीड, बार्शी नाका, मोमीनपुरा आणि झमजम कॉलनी या भागांतही कुत्र्यांनी नागरिकांना व बालकांना चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस मोहीम राबवण्यात आलेली नाही. शहरातील रस्त्यांवर कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणेही जिकिरीचे झाले आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप बीडमधील स्थानिक रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

 विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट; कडक कारवाईची मागणी

भटक्या कुत्र्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक यांनाही या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात हे संकट अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.