Mumbai Monsoon Update : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशातच, मुंबईकरांना तूर्तास या पावसापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून अंधेरी सबवे, वडाळा, किंग्ज सर्कल आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यांसारख्या सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. याचा थेट फटका मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन सेवेलाही बसला असून लोकल संथ गतीने धावत आहेत.
ADVERTISEMENT
हाय टाइडचा इशारा
शहरातील अंधेरी, सांताक्रूझ, खार, वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, पवई, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड या प्रमुख भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसाच्या जोडीला मुंबईत समुद्रात हाय टाइडचा (उधाणाचा) इशाराही देण्यात आला आहे. दुपारी 1:45 वाजता समुद्रात तब्बल 14 फुटांपर्यंतच्या उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुपारी 1 च्या सुमारास अत्यंत तीव्र पावसाचा अंदाज आहे. यामुळे किनारपट्टीवरील नागरिक आणि मच्छिमारांना सतर्क राहण्याचा आणि समुद्रात न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हे ही वाचा : लठ्ठपणावरुन टोमणे आणि पैशांची मागणी... स्टाफ नर्सची निर्घृण हत्या
वीकेंडपर्यंत दिलासा नाही
मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये जलमय परिस्थिती निर्माण होते आणि यंदाही तीच पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होते आणि मुंबईकरांचे हाल होतात. विशेषतः अंधेरी सबवे, मालाड, जोगेश्वरी, कुर्ला, मुलुंड आणि कांजूरमार्ग या भागांमध्ये नेहमीप्रमाणे यंदाही गंभीर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरूच राहील. वीकेंडपर्यंत म्हणजेच शनिवार-रविवारपर्यंत मुंबईकरांना या पावसापासून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
हे ही वाचा : एड्स बाधित महिलेवर कथित बलात्कार, न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना कोणती कारणं दिली?
मुंबईतील पावसाची आकडेवारी (1 जुलै सकाळी 8:30 ते 2 जुलै सकाळी 5:30 पर्यंत) :
गेल्या 24 तासांत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सांताक्रूझ येथे 165.9 मिमी, जुहू विमानतळ 164.5 मिमी, विक्रोळी 163 मिमी, राम मंदिर 157 मिमी आणि वांद्रे येथे 141.5 मिमी पाऊस पडला असून इतर अनेक भागांत 90 ते 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, मुंबई शहरात सरासरी 49 मिमी, पूर्व उपनगरात 99 मिमी आणि पश्चिम उपनगरात 90 मिमी पाऊस झाला आहे. तर विक्रोळीतील टागोर नगर शाळेच्या परिसरात सर्वाधिक 146.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आगामी काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











