गौरव साळी, जालना: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना शहरातील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र, सुदैवाने घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश
ही घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यात घडली. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे, घराच्या किचनचा दरवाजा तोडून चोरटे आत शिरल्याचेही तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा>> बीड हादरलं! सासरवाडीत राहणाऱ्या जावयाचा कोणी केला निर्घृण खून? थेट काढला कोथळा..
कार्यालयीन कामकाजासाठी वापरला जातो बंगला
रावसाहेब दानवे सध्या या बंगल्यात वास्तव्यास नसल्याची माहिती समोर आली आहे. या बंगल्याचा वापर मुख्यत्वे कार्यालयीन कामकाजासाठी केला जातो. त्यामुळे घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नव्हते.
चोरीला काहीही गेले नाही
घरात प्रवेश करूनही चोरट्यांच्या हाती कोणतीही मौल्यवान वस्तू लागली नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या घटनेत कोणतीही चोरी झालेली नसून केवळ चोरीचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा केले असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> बायकोच्या पोटात बाळ, डोहाळे जेवणादरम्यान नवऱ्याचा संशय, DNA ची मागणी अन्..
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण
राज्यातील ज्येष्ठ नेत्याच्या बंगल्यातच चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











