Mumbai Rain Alert: मुंबई: मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता हा पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत ज्या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, त्या भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत आहेत.
ADVERTISEMENT
अरबी समुद्रातील हवामान प्रणालीमुळे पावसाला पोषक वातावरण
सध्याच्या उपग्रह चित्रांनुसार अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाली असून ते महाराष्ट्राच्या दिशेने सक्रिय आहेत. याशिवाय अरबी समुद्रात चक्रीय अभिसरण (Cyclonic Circulation) तयार झाले आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा>> ‘असावा एखादा छंद...’ ट्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पण नेमकं आहे तरी काय?
दुसरीकडे, मध्य प्रदेशापासून तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालीचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर होत असून त्या भागातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकणात पावसाचा जोर राहणार कायम
उपग्रह चित्रांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण परिसरावर दाट ढगांचे आच्छादन स्पष्ट दिसत आहे. या ढगांची तीव्रता अधिक असल्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागातही ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा प्रभाव
विदर्भातही ढगांची सक्रियता वाढली असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
हे ही वाचा>> जून-जुलै महिन्यात पावसाची स्थिती असेल कशी? जाणून घ्या
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
29 जून : पालघरला रेड अलर्ट
सोमवार, 29 जून रोजी पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट असून उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी येलो अलर्ट लागू आहे.
30 जून : कोकण आणि घाट परिसरात पुन्हा जोरदार पाऊस
मंगळवारी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
1 जुलै : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट कायम
बुधवारीही मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे.
विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट म्हणजे काय?
- रेड अलर्ट : अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
- ऑरेंज अलर्ट : मुसळधार पावसाची शक्यता. सतर्क राहण्याचा इशारा.
- येलो अलर्ट : हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट किंवा स्थानिक पातळीवरील हवामानातील बदलांची शक्यता.
जुलैच्या पहिल्या आठवड्यातही चांगल्या पावसाची शक्यता
हवामान विभागाने यापूर्वीच जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता. नैर्ऋत्य मान्सूनला पोषक परिस्थिती तयार झाल्याने आणि अरबी समुद्रातून येणारे दमदार वारे सक्रिय झाल्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











