नवी मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने आजवरचे सगळे विक्रम मागे टाकत अत्यंत मोठा इतिहास रचला आहे. महिला विश्वचषकाचा आज (2 नोव्हेंबर) अंतिम सामना पार पडला. ज्यामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा किताब पटकावला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत संघाला 52 धावांनी पराभूत करून भारताच्या महिला संघाने आपला पहिलावहिला विश्वचषक जिंकला आहे. मागील अनेक वर्षांपासून महिला भारतीय संघ जे स्वप्न पाहत होता ते अखेर पूर्ण केलं आहे. हा विजय केवळ एक सामना नव्हता, तर भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे, ज्याने लाखो चाहत्यांना आनंदाने उभारी दिली.
ADVERTISEMENT
थरारक अंतिम सामना
हा अंतिम सामना भारतातील नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर जगभरातील करोडो चाहते टीव्ही आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हा सामना पाहत होते. या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
हे ही वाचा>> World Cup 2025: विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला घरी पाठवणारी टीम इंडियाची वाघीण, कोण आहे जेमिमा?
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 298 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी दमदार सुरुवात दिली. मंधानाने 45 धावा (8 चौकार) केल्या, तर शेफालीने 87 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यामध्ये तिने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 धावा, जेमिमा रॉड्रिग्स 24 धावांच्या छोट्या पण अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केल्या. यानंतर आलेल्या दीप्ती शर्माने 58 धावांची अत्यंत निर्णायक खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघ 298 धावांपर्यत पोहचू शकला.
उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार लॉरा वोल्वार्टने 101 धावा (11 चौकार, 1 षटकार) केल्या. मात्र, तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी अत्यंत अचूक गोलंदाजी करत द. आफ्रिकेवर सतत दबाव ठेवला.
हे ही वाचा>> Ind vs Aus: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते आपल्या मुंबईच्या रोहितने करून दाखवलं!
या अंतिम सामन्यात फिरकीपटू दिप्ती शर्माने आपल्या 9.3 ओव्हरमध्ये अवघ्या 39 धावा देत तब्बल 5 विकेट घेतल्या. तर शेफाली वर्माने ऐन मोक्याच्या वेळी 2 बळी घेतले. तसंच तिने 7 ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली. ज्यामुळे द. आफ्रिकेवर बराच दबाव आला.
प्रमुख खेळाडूंच्या कामगिरी
शेफाली: सामनावीर (Player of the Match) म्हणून निवडली गेली. तिच्या आक्रमक फलंदाजीने भारताला मजबूत सुरुवात दिली. तर मोक्याच्या वेळी दोन विकेटही घेतल्या.
दीप्ती शर्मा: मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार दिप्तीने पटकावला. सर्वाधिक विकेट घेत दिप्तीने या विश्वचषकात आपली छाप सोडली. तर अंतिम सामन्यात फलंदाजी करताना 58 धावा आणि गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेत अत्यंत मोलाची भूमिका बजावली.
स्पर्धेतील भारताची कामगिरी ही उत्कृष्ट होती. गटसाखळीत भारताने पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका यासारख्या मोठ्या संघाला पराभूत केले होते, तर उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करत मोठा इतिहास रचला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
ADVERTISEMENT











