वसई : सुट्टी असल्याने मुलं क्रिकेट खेळायला गेली, पण समोरचं भयंकर दृश्य पाहून पळत सुटली!

Vasai Crime News : वसईच्या आनंद नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली असून, माणिकपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Vasai Crime News

Vasai Crime News

मुंबई तक

11 May 2026 (अपडेटेड: 11 May 2026, 09:15 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वसई : सुट्टी असल्याने मुलं क्रिकेट खेळायला गेली

point

पण समोरचं भयंकर दृश्य पाहून पळत सुटली!

Vasai Crime News : वसईच्या आनंद नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमा बाई चाळीच्या मागील भागात असलेल्या या मोकळ्या जागेवर गेल्या तीन दिवसांपासून आग लागलेली होती. आज रविवारची सुट्टी असल्याने काही मुले या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी जमली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खेळत असताना या मुलांच्या नजरेस एक विखुरलेला मानवी सांगाडा पडला. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे मुलांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : प्रेयसीच्या लग्नाला जाणं पडलं महागात, जीवाला मुकला तरुण; नेमकं काय घडलं?

 विखुरलेली हाडे आणि चिल्लर पैसे; घटनास्थळी पोलिसांचा राबता

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच माणिकपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत मानवी खोपडी आणि शरीराची इतर हाडे जमिनीवर विखुरलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, या हाडांच्या सांगाड्याच्या जवळ काही चिल्लर पैसेही पोलिसांना सापडले आहेत. ही हाडे नेमकी कोणाची आहेत आणि ती किती जुनी आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या पोलिसांनी या परिसराचा ताबा घेतला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आग लागलेल्या भूखंडावरच हा सांगाडा सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

हेही वाचा : पुणे : नवऱ्यासमोर बायकोची आठव्या मजल्यावरून उडी, थरकाप उडवणारा Video

तीन महिन्यांत दुसरी घटना; परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

आनंद नगर परिसरामध्ये मानवी सांगाडा सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये एक मानवी सांगाडा आढळून आला होता. त्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच, आता पुन्हा एकदा मोकळ्या भूखंडावर अशाच प्रकारे मानवी अवशेष सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकाच परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या घटनांच्या पुनरावृत्तीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मृत्यूचे रहस्य उलगडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; तपास सुरू

माणिकपूर पोलीस आता या मानवी सांगाड्याच्या रहस्याचा छडा लावण्याच्या दृष्टीने तपास चक्रे फिरवत आहेत. हा सांगाडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (Forensic Lab) तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटू शकेल. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक होता की ही हत्येची घटना आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या नोंदीही पोलीस तपासून पाहत आहेत. आनंद नगरमधील या गूढ घटनेचा उलगडा करण्यात माणिकपूर पोलिसांना यश येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वसई : हाण की बडीव! भर लग्नात सगळेच एकमेकांवर तुटून पडले, तुफान हाणामारीचा VIDEO